काँग्रेस ओबीसी आरक्षणाचे खरी मारेकरी ; फडणवीस कडाडले


नागपूर – राज्यात मराठा आरक्षणासोबतच ओबीसी राजकीय आरक्षणाचा मुद्दा ज्वलंत बनला आहे. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे विरोधी पक्ष असलेल्या भाजपने आक्रमक भूमिका घेतली असून, आज (२६ जून) राज्यभरात भाजपने चक्का जाम आंदोलन केले. राज्यातील विविध ठिकाणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी चक्का जाम आंदोलनाचे नेतृत्व केले. देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरातील आंदोलनात सहभाग घेत महाविकास आघाडी सरकारवर आरक्षणाच्या मुद्द्यावरून हल्लाबोल केला.

फडणवीस यांनी आंदोलनात कार्यकर्त्यांशी बोलताना ठाकरे सरकारचा समाचार घेतला. फडणवीस म्हणाले, ओबीसींच्या हक्कां करिता भाजप हजारो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. माझा विश्वास आहे की, एक तर ओबीसींचे आरक्षण सरकारला पुन्हा द्यावे लागेल, नाहीतर खुर्ची खाली करावी लागेल. बावनकुळे म्हणतात ते खरे आहे. राजकीय षडयंत्रामुळे हे आरक्षण गेले आणि हे किती नाटकबाज आहेत. कालपासून नवीन सूर सुरू झाला. मोदीजींनी डेटा दिला नाही. मी चॅलेंज देऊन सांगतो. सत्तेत असलेल्या पक्षांच्या नेत्यांना खुले चॅलेंज देतो. सर्वोच्च न्यायालयाने हे आरक्षण कुठल्या डेटाच्या आधारावर द्यायला सांगितले आहे.

हा जनगणनेचा डेटा नाही. तो इम्पिरिकल डेटा आहे आणि तो राज्य मागासवर्ग आयोगाला जमा करायचा आहे. पण, या सरकारचे एक मस्त आहे. यांचे एकमेकांशी पटत नाही आणि यांचे एका गोष्टीवर एक सुरू आहे. एकमेकांचे लचके तोडत आहेत. पण, सत्तेचे लचके तोडताना तिघेही एकत्र आहेत. जिथे धडपडले. जिथे नापास झाले. तिथे एकाच सुरात बोलतात, हे मोदीजींनी केले, मोदीजींनी केले पाहिजे. मला तर असे वाटते की, एखाद्या दिवशी यांच्या बायकोनं मारले, तरी हे त्यासाठीही मोदीजींनाच जबाबदार ठरवतील, अशी परिस्थिती यांची झाली असल्याचा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

स्वतः काही करायचं नाही. यांनी मराठा आरक्षण घालवले. ओबीसी आरक्षण घालवले. सगळ्या घटकांना जमीनदोस्त करायचे आणि मोदीजींनी केले, हे मोदींमुळे झाले म्हणायचे. म्हणूनच म्हणालो, यांच्या बायकोने मारले तरी म्हणतील मोदीजीच जबाबदार आहेत. पण, ये पब्लिक है, ये सब जानती है. ओबीसी आरक्षणाचे खरे मारेकरी कोण, तुम्ही सगळ्यांनी लिहून घ्या ओबीसी आरक्षणाची जी याचिका दाखल झाली, ज्या याचिकेमुळे हा निकाल आला, ही याचिका दोन जणांनी दाखल केली होती. पहिला व्यक्ती म्हणजे वाशिममधील काँग्रेस आमदाराचा मुलगा आणि दुसरा व्यक्ती भंडारा जिल्हा परिषदेचा काँग्रेसचा अध्यक्ष, असे म्हणत ओबीसी आरक्षणाचे खरी मारेकरी काँग्रेस असल्याचा गंभीर आरोप फडणवीस यांनी काँग्रेसवर केला.

ज्यांनी ओबीसी आरक्षणाविरोधात याचिका दाखल केली ते दोन्हीही काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत. ज्यांची काँग्रेसच्या कार्यालयामध्ये उठबस आहे, ज्यांना काँग्रेसच्या कार्यालयामध्ये मान सन्मान दिला जातो. ही याचिका त्यांनी दाखल केली आहे. हे दोघे जणं पहिल्यांदा नागपूरच्या उच्च न्यायालयात गेले, त्यावेळी आमचे सरकार होते. मी त्यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सूत्रे दिली. पंकजा मुंडे यांच्याकडे ग्रामविकास खाते होते. तिकडे राम शिंदे होते. आमचे संजय कुठे होते? या सगळ्यांना एकत्रितपणे बसवले. त्यांना मी सांगितले हे मोठे सगळे षडयंत्र आहे, जे आपल्याला हाणून पाडले पाहिजे. बावनकुळेंचे मी अभिनंदन करेल, ही केस चंद्रशेखर बावनकुळे सरकारच्या वतीने लढले आणि नागपूरमध्ये उच्च न्यायालयाने आपल्या सरकारच्या बाजूने निर्णय दिला, असे फडणवीस म्हणाले.