पुणेे – पंतप्रधान मनमोहन सिंह हे अर्थतज्ज्ञ असूनही स्वातंत्र्यानंतर देशाची आर्थिक दुरवस्था पाहाण्याची वेळ आली आहे. देशाचे सार्वभौमत्व धोक्यात आणण्यासाठी बाह्यशक्ती सरसावल्या असून डॉलरच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन होण्यामागे या बाहयशक्क्तींचाच हात आहे. स्वातंत्र्यानंतर देश प्रथमच अशा संकटात सापडला असून लोकशाही आघाडीचे सरकारच या परिस्थितीतून देशाला बाहेर काढू शकते, असा दावा भाजपचे सरचिटणीस आणि प्रवक्ते राजीव प्रताप रुडी यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केला.
पंतप्रधान अर्थतज्ज्ञ असूनही देशाची दुरवस्था – रुडी
रविवारी गुजरातचे मुख्यमंत्री आणि आगामी लोकसभा निवडणुकीसाठीचे प्रचारप्रमुख नरेंद्र मोदी यांची येत्या रविवारी येथे निर्धार सभा आहे. प्रचाराचा शुभारंभ येथे होणार असल्याने सभेच्या तयारीची माहिती घेण्यासाठी रुडी येथे आले होते. पदाधिकार्यांशी झालेल्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी भाजपचे शहर अध्यक्ष अनिल शिरोळे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
रुडी म्हणाले, आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेउन चर्चेविनाच अन्न सुरक्षा विधेयकाचा अध्यादेश काढण्यात आला आहे. ९ वर्षांपासून सत्तेत असताना ते हे विधेयक आणू शकले नाहीत याला काय म्हणायचे. भाजपाचा अन्न सुरक्षा विधेयकाला विरोध नाही. परंतु त्यावर सभागृहात चर्चा होउन त्यातील त्रुटी दूर करूनच त्याची अंमलबजावणी करावी, अशी आमची मागणी आहे. अन्यथा मनरेगा योजनेप्रमाणे अवघ्या काही दिवसातच या योजनेची गंभीर स्थिती होईल.
बांग्लादेशातून बिहार आणि उत्तर प्रदेशामध्ये होणारी घुसखोरी ही दहशतवादाला कारणीभूत असल्याचे वारंवार सिद्ध झाले आहे. ही बाब संसदेत केंद्र सरकारच्या निदर्शनास आणून दिली आहे पण ही घुसखोरी रोखण्यात शासन अपयशी ठरले आहे. असा आरोप रुडी यांनी केला. दहशतवादी ओसामा बिन लादेनचा आदरार्थी उल्लेख करणार्या आणि मुंबईतील अतिरेकी हल्ल्यातील शहीद पोलिस अधिकारी हेमंत करकरे यांचा हिंदू आतंकवादी म्हणून उल्लेख करणार्या दिग्विजय सिंह यांच्याकडून आणखी काय अपेक्षा करणार? असा चिमटाही त्यांनी काढला.
