दलाई लामांची सुरक्षा वाढविली

धरमशाला दि.८ – बिहारच्या बोधगया येथे रविवारी झालेल्या नऊ साखळी स्फोटानंतर भारतात आश्रयास असलेले तिबेटचे आध्यात्मिक गुरू दलाई लामा यांची, त्यांच्या कार्यालयाची तसेच सुगलगखांक मंदिराची सुरक्षा व्यवस्थाही कडक करण्यात आली असल्याचे समजते. केंद्रीय तिबेट सुरक्षा प्रशासनाचे सुरक्षा विभाग सचिव न्गोप दोर्जी यांनी ही माहिती दिली.

ते म्हणाले की भारत सरकारने दलाई लामांना यापूर्वीच झेड सुरक्षा व्यवस्था प्रदान केली आहे. बोधगयेतील स्फोटानंतर दलाई लामांचे निवासस्थान असलेला मठ, कार्यालय व मंदिरात खासगी सुरक्षा रक्षकांनाही दक्षतेच्या सूचना दिल्या गेल्या आहेत तसेच या भागाची एकूण सुरक्षा व्यवस्थाही वाढविली गेली आहे.

दलाई लामा बोधगयेला नियमित भेट देतात असे सांगून ते म्हणाले की १ ते १० जानेवारी २०१२ मध्येही लामांनी येथे आयाजित करण्यात आलेल्या कालचक्र समारंभात हजेरी लावली होती. शनिवारीच दलाई लामा यांचा ७८ वा वाढदिवस साजरा करण्यात आला व त्यासाठी धरमशाला येथे हजारो बौद्ध भिख्खू आणि निर्वासित तिबेटी नागरिकांनी गर्दी केली होती. यावेळी विशेष प्रार्थनेचे आयोजनही केले गेले होते.