बुद्धांची तीर्थक्षेत्रे धोक्यात

भारतात १९९० च्या दशकापासून सुरू झालेल्या दहशतवादी हल्ल्यांच्या सत्रांमध्ये अनेक मंदिरांना लक्ष्य करण्यात आले. भारतातल्या अनेक नामवंत मंदिरांमध्ये कधी ना कधी बॉम्बस्फोट झाले. काही वेळा जनतेची दिशाभूल करण्यासाठी काही मशिदींनाही लक्ष्य करण्यात आले, परंतु आजवर तरी कधी बुद्धांची तीर्थक्षेत्रे अतिरेक्यांच्या हिट लिस्टवर नव्हती. काल प्रथमच बिहारमधील बोधगयेला लक्ष्य करण्यात आले आणि तिथे नऊ बॉम्बस्फोट झाले. बिहार हेही राज्य तसे आजवर अतिरेकी कारवायांपासून मुक्त होते. पण त्यालाही काल धक्का बसला. या घटनेमागे कोणाचा हात असावा याचा अंदाज बांधला जात आहे आणि या हल्ल्याचे धागेदोरे नांदेड जिल्ह्यापर्यंत येऊन पोचत आहेत. पोलिसांनी प्राथमिक चौकशीअंती ज्या अतिरेक्याकडे अंगुलीनिर्देश केला आहे तो इंडियन मुजाहेदिनचा अतिरेकी मकबुल सय्यद ऊर्फ झुबेर हा नांदेड जिल्ह्यातल्या धर्माबादचा रहिवासी आहे.

एका सर्वसामान्य कुटुंबातला हा वाट चुकलेला तरुण १९९० सालपासून दहशतवादी संघटनांशी संबंधित आहे. इंडियन मुजाहेदिन या संघटनेने आजवर घडवलेल्या दहशतवादी कारवायांमध्ये ज्या प्रकारची स्फोटके वापरलेली आहेत तशीच स्फोटके बोधगयेतल्या स्फोटात सापडली आहेत. त्यावरून हे कृत्य इंडियन मुजाहेदिनचे असावे असा तर्क केला जात आहे. या संघटनेमध्ये अशा प्रकारची जी स्फोटके किंवा हातबॉम्ब तयार करण्यात मकबुल सय्यद हा वाकबगार मानला जातो आणि म्हणून त्याच्याकडे संशयाची सूई वळायला लागली आहे. बिहारमध्ये घडलेला हा अशा प्रकारचा पहिलाच स्फोट आहे. मात्र तिथल्या पोलिसांनी आता राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एन.आय.ए. या संघटनेशी सहकार्य करून शोधकार्य सुरू केले असून १२ संशयित अतिरेक्यांची रेखाचित्रे जारी केली आहेत. बोधगयेमध्ये अशा प्रकारचे स्फोट का व्हावेत, असा प्रश्‍न अनेकांना पडला आहे. परंतु जगात घडणार्‍या काही विशिष्ट घटनांचा अभ्यास करणार्‍या अभ्यासकांना असा प्रश्‍न पडलेला नाही. उलट त्यांनी भारतातल्या बुद्धांच्या पवित्र स्थळांना अतिरेकी संघटना लक्ष्य करू शकतात, असा अंदाज व्यक्त केलेला होता. कारण अतिरेकी संघटनांचे हात बुद्धांच्या धर्मक्षेत्रापर्यंत पोचावेत अशा काही घटना जगात इतरत्र घडलेल्या आहेत. बोधगयेमध्ये झालेले स्फोट हा ब्रम्हदेश (म्यानमार)मध्ये घडलेल्या घटनांची प्रतिक्रिया आहे. म्यानमारमध्ये बहुसंख्य लोक बुद्ध आहेत.

खरे म्हणजे बुद्ध धर्म हा शांतीचा संदेश देणारा अहिंसावादी धर्म आहे. परंतु म्यानमारमधील बुद्धांनी त्यांच्या देशातील रोहिंग्या मुस्लीम या लोकांचे शिरकाण सुरू केले आहे. जगाला अहिंसेचा संदेश देणार्‍या बुद्धधर्माचे पाईक तिथे हातात शस्त्रे घेऊन मुस्लिमांवर हल्ले करत आहेत. गेल्या नोव्हेंबर ते मार्च या कालावधीत बुद्धांच्या अशा हल्ल्यांमध्ये हजारावर रोहिंग्या मुस्लीम मारले गेले आहेत आणि सुमारे दीड लाख मुस्लीम बेघर झालेले आहेत. ज्या देशात मुस्लिमांची संख्या केवळ एक टक्का आहे त्या देशातले ९९ टक्के बहुसंख्य लोक त्यांच्यावर हल्ले करायला लागले तर त्या एक टक्का लोकांची काय अवस्था होत असेल याचा विचारही न केलेला बरा. या रोहिंग्या मुस्लिमांना आता कोणाचा आधार राहिलेला नाही. हल्ले व्हायला लागले की ते बांगला देशात पळून जातात. तिथे बहुसंख्य मुस्लीम असूनही तिथले मुस्लीम या रोहिंग्या मुस्लिमांना आधार देत नाहीत. त्यामुळे जवळपास दोन लाख मुस्लीम जमेल त्या देशात विस्थापित होऊन रहात आहेत. यापैकी बरेच लोक थायलंडमध्ये निर्वासित म्हणून आलेले आहेत. मात्र ज्यांना देशाच्या बाहेर पडता आले नाही ते मुस्लीम म्यानमारमध्ये जीव मुठीत धरून जगत आहेत. या रोहिंग्या मुस्लिमांच्या या मजबुरीमुळे सार्‍या जगातले मुस्लीम हवालदिल झाले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पाकिस्तान समर्थित इंडियन मुजाहेदिनने भारतातल्या बुद्ध स्थळांना लक्ष्य केले आहे.

मुळात ब्रह्मदेशातले बुद्ध एवढे का चिडले हा प्रश्‍न महत्वाचा आहे. त्या प्रश्‍नाचे उत्तर अफगाणि स्तानातल्या घटनेत दडलेले आहे. २००१ साली अफगाणिस्तानच्या बामियान परगण्यात तालिबान मुस्लीम अतिरेक्यांनी भगवान गौतम बुद्धाची पुरातन वालुकामय मूर्ती फोडली होती. या घटनेने जगभरातल्या बौद्ध जनतेत मोठा असंतोष निर्माण झाला. त्यांनी या घटनेचा निषेध केला खरा, पण तो शांततामय मार्गाने केला. म्यानमारमधले बुद्ध मात्र हिंसक प्रतिक्रिया व्यक्त करण्याच्या विचारात होते. परंतु २००१ साली म्यानमारमध्ये लष्करी प्रशासन होते आणि दंगलीत गुंतलेल्या लोकांना दिसताक्षणी गोळ्या झाडल्या जात होत्या. म्हणून तिथल्या बुद्धांनी शांतता पाळली. २०११ साली तिथले लष्करी शासन हटले आणि दहा वर्षांपासून सूप्तावस्थेत असलेली त्यांच्या मनातली सूडभावना उफाळून आली. लोकांच्या मनातील सूडभावनेला खतपाणी घालणार्‍या काही बुद्ध धर्मगुरुंनी लोकांना हिंसेचा संदेश द्यायला सुरुवात केली आणि त्यामुळे म्यानमारमधले बुद्ध हातात शस्त्रे घेऊन मुस्लिमांवर हल्ले करत सुटले.

साडे सात कोटी लोकसंख्येच्या म्यानमारमध्ये केवळ साडे सात लाख मुस्लीम अाहेत. त्यांची संख्या कमी असल्यामुळे ते बहुसंख्य बुद्धांचा प्रतिकार करू शकले नाहीत. म्हणून जगभरातल्या मुस्लिमांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. एकंदरीत अफगाणिस्तानातल्या घटनेची प्रतिक्रिया म्यानमारमध्ये उमटली आणि म्यानमारमधील घटनांची प्रतिक्रिया भारतात उमटली. शेवटी सूड घेणारे लोक कुणाची शिक्षा कोणाला देत आहोत याचा फार तर्कशुद्ध विचार करत नसतात. तसेच आता घडायला लागले आहे. अतिशय शांततामय जीवन जगणार्‍या भारतातल्या बुद्धांसमोर विनाकारणच हे दहशतवादाचे नवे संकट आव्हान स्वरूप घेऊन उभे राहिले आहे.