पुणे, दि. 7 (प्रतिनिधी) – महाराष्ट्र साहित्य परिषदेची घटना ही चाळीस वर्षापूवीची असल्याने त्यात काळानुरूप काही दुरुस्ती करावी लागणार आहे, त्यासाठी नेमलेल्या समितीची बैठक आज पार पडली. घटना दुरुस्तीचे प्रारूप ठरविण्यासाठी किमान वर्षभराचा कालावधी लागेल अशी माहिती समिती सदस्य आणि मसापचे कोषाध्यक्ष सुनील महाजन यांनी दिली.
चाळीस वर्षानंतर साहित्यपरिषदेची घटना दुरुस्ती
’मसाप’ची घटना 40 वर्षा पूर्वीची असून त्यामध्ये 2001 मध्ये काही बदल करण्यात आले आहेत. अमलात आली तेव्हापासून कार्यकारिणी निवडप्रक्रिया तसेच अन्य कामकाज या घटनेनुसारच सुरू आहे. घटना दुरुस्तीसाठी मसाप प्रक्रियेतून सभासदांकडून सूचना मागविण्यात आल्या होत्या. समितीला सुमारे 200 सूचना मिळाल्या आहेत. यामध्ये निवडणुक प्रक्रियेतील बदलांपासून शाखा विस्तार, शाखांना काही अधिकार देणे या बाबतच्याही सूचना आल्या आहेत. या बैठकीला मसापच्या कार्याध्यक्षा डॉ. माधवी वैद्य, प्रमुख कार्यवाह, प्रकाश पायगुडे, कल्याणी नामजोशी, सु.प्र. कुलकर्णी उपस्थित होते.
मसापची 29 पानी घटना पूर्णपणे बदलण्यात येणार नसून त्यातील काही तरतुदींमध्ये बदल करण्यात येतील असे महाजन यांनी स्पष्ट केले. समितीने अंतिम मसुदा तयार केल्यानंतर कार्यकारिणीत त्याला मान्यता दिली जाईल. त्यानंतर सर्वसाधारण सभेत मान्यता घेऊन धर्मादाय आयुक्तांना अंतिम मान्यतेसाठी मसुदा सादर केला जाईल. या प्रक्रियेला वर्षाचा कालावधी लागण्याची शक्यता आहे, समितीची पुढढची बैठक 28 जुलैला होणार आहे, असे महाजन यांनी सांगितले
