कैरो दि.४- इजिप्तमध्ये मोर्शी हटाव संबंधी सुरू असलेल्या निदर्शनात लष्कराने बुधवारी सायंकाळी लोकशाही मार्गाने प्रथमच निवडून आलेले अध्यक्ष मोहम्मद मोर्शी यांना पदच्युत केल्याचे जाहीर केले आहे. सायंकाळी सातच्या सुमारास लष्कराच्या अधिकार्यांनी मोर्शी यांना तुम्ही या पदावर आता नाही आहात असे बजावून त्यांची अज्ञातस्थळी रवानगी केली असल्याचे समजते. इजिप्तचे आर्मी कमांडर जनरल अब्देल फते अल सिर्सी यांनी दूरदर्शनवरून देशाला उद्देशून केलेल्या भाषणात मोर्शी यांना पदच्युत करण्यात आल्याचे व त्यांच्या जागी इजिप्त कॉन्स्टीट्यूशनल कोर्टाचे मुख्य न्यायाधीश अॅदली मन्सूर यांची प्रभारी म्हणून नियुक्ती केली असल्याचे सांगितले.
मोर्शी यांनी इजिप्तमधील जनतेच्या मागण्या प्रथम पूर्ण कराव्यात यासाठी त्यांना ४८ तासांची मुदत दिली होती. मात्र मोर्शी यांनी ही मुदत फेटाळून लावली होती. त्यानंतर ४८ तास उलटताच लष्कराने ही कारवाई केली. लष्कराने देशाची घटनाही कालबाह्य ठरवून रद्द केली असून जनतेला अध्यक्षपदासाठी लवकरच निवडणुका घेतल्या जातील अशी ग्वाही दिली आहे. मोर्शी यांच्या हकालपट्टीची घोषणा केल्यानंतर त्वरीत देशातील मुस्लीम ब्रदरहूड चे टिव्ही स्टेशन ऑफ एअर करण्यात आले.
मोर्शी हटाव या मागणीसाठी निदर्शने करत असलेल्या लक्षावधी नागरिकांनी लष्कराच्या या कृतीबद्दल जल्लोष केला. जनरल सिसी यांनी लष्कराने मोर्शी यांची हकालपट्टी करून लष्करावरची ऐतिहासिक जबाबदारी पार पाडली गेली असल्याचे जाहीर केले आहे. मोर्शी यांना परदेशात पळून जाता येऊ नये यासाठी विमानतळांवरील अधिकार्यांना कडक निगराणीच्या सूचना दिल्या गेल्या आहेत तसेच मोर्शी समर्थकांकडून होत असलेल्या निदर्शकांवरही कडी नजर ठेवली जात आहे.