वारकर्‍यांच्या उत्साहाने दिवाघाटाची चढण झाली ‘वृंदावन’

पुणे,दि.3:प्रतिनिधी: आळंदीहून निघालेली संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी आपला तीन लाख भाविकांचा लवाजमा सांभाळून दोन दिवसांचा पुण्याचा मुक्काम संपवून संत सोपान काका यांच्या सासवडला रवाना झाल्या. पंढरपूरच्या वारीतील पुणे ते सासवड हे अंतर सर्वाधिक मानले जाते त्यातही त्यातच पाच किलोमीटरचा अतिशय चढणीचा दिवे घाट असल्याने वारकर्‍यांना जवळजवळ पंधरा तास चालावे लागते. पण वारकरी बंधूभगिनींनी ते अंतर लीलया तर चढलेच पण ते चढण चढताना त्यांचा उत्साह ओसांडून वाहत होता. वारकर्‍यांनी अक्षरश: नाचत, गात, फुगड्या खेळत आणि विठुरायाचा गजर करत हे अंतर कापले. यावेळी निसर्गही प्रसन्न असल्याने वारकर्‍यांचा आनंद द्विगुणित होत होता. त्यामुळे जेवढे चढण अवघड तेवढा आनंद सोहोळा अधिक अशी स्थिती झाली होती.

सकाळी सहा वाजता भवानीपेठेतील पालखी विठोबा चौकातून निघालेल्या संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्या दुपारी वडकीनाला येथील भोजन आणि विश्रांती आवरून तीन वाजता दिवा घाटाच्या पायथ्याशी पोहोचल्या. दरवर्षीप्रमाणे यावर्षीचेही वैशिष्ठ्य म्हणजे दिवाघाटातील पालखीचे चढ चढणे हा सोहोळा पाहण्यासाठी आजूबाजूच्या परिसरातील काही लाख लोक सकाळपासून येतात. आज सारा डोंगर लोकांच्या उपस्थितीने भरून गेला होता. प्रत्यक्ष पालखी जरी तीन वाजता आली तर अनेक दिंड्या व एक एक वारकरी असे लोक सकाळपासूनच चढ चढू लागले होते. त्यांच्या स्वागताला आणि त्यांना पाणी, फराळाचे साहित्य देण्यासाठी हजारो लोक लोक उभे होते.

पालख्या चढ चढू लागल्या आणि ‘बोला पुंडलीक वरदेव हरि विठ्ठल’ चा जयघोष करीत वारकर्‍यांनी फेर धरले, मृदंगाचा ठेका वाढला. वारकर्‍यांनी कंबरेला पंचा घट्ट बांधला, महिलांनी कंबरेचा पदर घट्ट खोचला आणि मग दिवाघाटाला ‘वृंदावना’चे स्वरूप आले. या आनंदसोहोळ्यात वारी बघायला आलेलेही सहभागी झाले. कोणी तरी संत तुकाराम महाराज यांचा एक एक अभंग सांगू लागला आणि त्याला त्याच ओळीने प्रतिसाद मिळू लागला. मधून मधून मान्सूनचा पाउस छोट्या छोट्या सरींनी आनंदाचा वर्षाव करत हेाता. भक्तीच्या आनंदात सारे वैष्णव इतके ओलेचिंब झाले होते की, पावसाने ओले होणे त्यापुढे काहीच नव्हते. या वारीतच दुपारी केंव्हा तरी खासदार सुप्रीया सुळे दाखल झाल्या. त्यांनी डोक्यावर तुळशीवृंदावन घेतले होते आणि भजनही म्हणत होते. नंतर मात्र काही महिलांनी त्यांना फुगडी व झिम्मा खेळण्याचा आग्रह केला म्हणून त्याही खेळात सहभागी झाल्या. दिवाघाट संपल्यावर सार्‍यांनी थोडी थोडी विश्रांती घेतली आणि सायंकाळी सहापर्यत सासवड गाठले.

देहूआळंदीहून निघालेल्या अनुक्रमे संत तुकाराम व संत ज्ञानेश्वर यांच्या पालख्या पुण्याच्या प्रवेशद्वाराशी एकत्र येतात व पुण्याच्या वेशीशी पुन्हा निरनिराळ्या मार्गाने जातात. संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी सासवड, नीरा, लोणंद, फलटणमार्गे जाते. तर संत तुकाराम महाराज यांची पालखी हडपसर, लोणीकाळभोर, चौफुला, बारामती, अकलूज यामार्गाने जाते. या दोन्हींची भेट तेरा दिवसांनी पंढरपूरच्या वेशीजवळ वाखरीयेथे होते. संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या व दिंड्या यानी दुपारी लोणीकाळभोर येथे न्याहरी केली व संध्याकाळचा मुक्काम यवत येथे केला. ज्या ज्या गावातून या पालख्या जातात किंवा दुपारची न्याहरी, जेवळ वा सायंकाळचा मुक्काम पडतो त्या ठिकाणी त्या त्या ठिकाणी इंद्रायणी व चंद्रभागा यांच्या भगिनीनद्यांच्या काठावरील सारी तीर्थे अवतरतात. सारे गाव देहू, आळंदी आणि पंढरपूर बनून जाते.