
मुंबई : बँकांच्या एटीएममधून पैसे काढणे आता महाग होणार असून सर्व बॅंकांना एटीएम व्यवहारांवर लावण्यात येणाऱ्या किंमतींमध्ये वाढ करण्याची रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने परवानगी दिली आहे. कस्टमर चार्ज आणि गैर बँकिंग चार्जचा यामध्ये समावेश आहे. आरबीआयने त्याचबरोबर दोन बँकांमधील इंटरचेंज चार्जमध्येही वाढ करण्यास मंजुरी दिल्यामुळे आता फ्री लिमिटपेक्षा जास्त वेळा ट्रान्जेक्शन केल्यास जास्तीचे पैसे आकारले जाणार आहेत. 1 ऑगस्ट 2021 पासून आरबीआयचा हा नियम लागू होणार आहे.
एटीएममधून पैसे काढणे होणार महाग; बँकांना एटीएम चार्जमध्ये वाढ करण्याची आरबीआयने दिली परवानगी
बॅंकाकडून सध्या ग्राहकांना पाच ट्रान्जेक्शन फ्री देण्यात येतात. त्यामध्ये जर वाढ झाली तर ग्राहकाला 20 रुपये कस्टमर चार्ज लावण्यात येतो. या कस्टमर चार्जमध्ये आता एका रुपयाची वाढ करण्यात आली असून तो 21 रुपये एवढा करण्यात आला आहे. आता नवीन चार्ज कॅश रीसायक्लिंग मशिनवरही आरबीआयने हा चार्ज लावला आहे.
सर्व बँकांच्या एटीएमवरील आर्थिक देवघेवींवरील सध्याची इंटरचेंज फी 15 रुपयांवरुन वाढवून आरबीआयने ती 17 रुपये केली आहे. त्याचप्रमाणे गैर आर्थिक ट्रान्जेक्शनसाठी असणारी फी 5 रुपयांवरुन 6 रुपये करण्यात आली आहे. आर्थिक ट्रान्जेक्शन म्हणजे पैसे काढणे, किंवा पैशाचा व्यवहार करणे, तर गैर आर्थिक ट्रान्जेक्शन म्हणजे आपल्या खात्यावरील बॅलेन्स चेक करणे किंवा तशा प्रकारची कामे यांचा समावेश आहे.
सध्या मेट्रो शहरात महिन्याला तीन ट्रान्जेक्शन तर इतर शहरात पाच ट्रान्जेक्शन फ्री देण्यात येत आहेत. त्यावरील ट्रान्जेक्शनवर पैसे आकारण्यात येतात. आरबीआयने जून 2019 साली इंडियन बँक असोसिएशनचीच्या प्रमुखांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. त्या समितीने केलेल्या शिफारसींच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला आहे.
