
बॉलीवूडमध्ये नशीब काढण्यासाठी रोज शेकडो जण मुंबापुरीत दाखल होतात. नवागतांच्या गर्दीमुळे फिल्म इंडस्ट्रीमध्ये आजकाल एवढी स्पर्धा वाढली आहे की, आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येक कलाकार काहीतरी वेगळे करून दाखविण्यासाठी धडपडत असतो. हटके करून दाखविण्याच्या नादात आपल्या आरोग्याची फिकीर त्यांना वाटत नाही. अभिनेत्री कॅटरिना कैफसोबतही हल्ली असेच झाले आहे. प्रचंड कामाचा व्याप व एका सेटवरून दुसरीकडे सतत धावपळ करणारी कॅटरिना सध्या तापाने फणफणली आहे. अत्याधिक थकवा हे त्यामागचे कारण असल्याचे डॉक्टरांकडून सांगितले जात आहे. गेल्या आठवड्यात अर्जुन कपूरच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये नजरेस पडलेली कॅटरिना मागील चार दिवसांपासून तिच्या चित्रपटांच्या सेटवर फिरकलेलीच नाही. तिला तापाने घेरले आहे व त्यामुळे तिची प्रकृती एकदम खालावली असल्याचे सूत्रांकडून सांगितले जाते.
