सध्या काय करत आहेत आतापर्यंतचे इंडियन आयडॉल स्पर्धेचे विजेते स्पर्धक


आजवर हिंदी सिनेसृष्टीला अनेक बहुसंपन्न गायक बहाल करणार शो म्हणून छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय ‘इंडियन आयडॉल’ हा रिअॅलिटी शो ओळखला जातो. या स्पर्धेत आजवर सहभागी झालेल्या अनेक गायकांचे या शोने संपूर्ण आयुष्य बदलून टाकले. पण या स्पर्धेतील सहभागी म्हणा अथवा विजेते सध्या काय करत आहेत, असा प्रश्न आपल्यापैकी अनेकांना पडत असतो. त्याचीच माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत… चला तर जाणून घेऊया या स्पर्धकांबाबत…

गायक अभिजीत सावंतने इंडियन आयडॉलचे पहिले पर्व जिंकले होते. त्याला ही स्पर्धा जिंकल्यानंतर अनेक गाण्यांच्या ऑफर आल्या होत्या. पण आपल्याला त्यानंतर काम मिळत नसल्याचे त्याने म्हटले होते आणि तो सध्या लाइमलाइटपासून दूर असल्याचे पाहायला मिळते.

गायक संदीप आचार्यने इंडियन आयडॉलचे दुसरे पर्व जिंकले होते. पण आज संदीप आपल्यामध्ये नाही. त्याचे १५ डिसेंबर २०१३मध्ये निधन झाले.

इंडियन आयडॉलच्या तिसऱ्या पर्वाला २००७मध्ये सुरुवात झाली होती. त्यावेळी गायक प्रशांत तमांगने ही स्पर्धा जिंकली होती. पण सध्या तो कुठे आहे आणि काय करत आहे? याबाबतची कोणालाही माहिती नाही.

सौरभी देबबर्माने इंडियन आयडॉलचे चौथे पर्व जिंकले होते. कैलाश खेर, सोनाली बेंद्रे, जावेद अख्तर आणि अनु मलिक या पर्वाचे परिक्षक होते. याच सिझनमधील सौरभ थापाशी सौरभीने लग्न केले आहे.

इंडियन आयडॉल पर्व ५चा गायक श्रीराम चंद्र विजेता ठरला होता. त्याने ये जवानी है दीवानी, मेरे ब्रदर की दुल्हन आणि रेस 3 या चित्रपटांतील गाणी गायिली. बॉलिवूडमधील लोकप्रिय गायकांपैकी तो एक आहे. त्याचा देखील एक वेगळा चाहता वर्ग आहे.

गायक विपुल मेहताने इंडियन आयडॉलचे सहावे पर्व हे जिंकले होते. तो सध्या फिल्म इंडस्ट्रीपासून लांब असला तरी लाइव्ह शो करताना दिसतो.

इंडियन आयडॉलचे सातवे पर्व २०१३मध्ये सुरु झाले होते. या पर्वामध्ये अनेक लहान मुलांना गाण्याची संधी देण्यात आली होती. अंजना पद्मनाभन या पर्वाची विजेती ठरली होती.

१३ वर्षांची अनन्या श्रीतम नंदाने इंडियन आयडॉलचे ८ वे पर्व जिंकले होते. त्यावेळा सलीम मर्चंट, विशाल दादलानी आणि सोनाक्षी सिन्हा हे परिक्षक म्हणून दिसले होते.

इंडियन आयडॉलचे ९वे पर्व एलवी रेवंतने जिंकले होते. तत्पूर्वी त्याने ‘बाहुबली’ आणि त्यानंतर ‘अर्जुन रेड्डी’ या दाक्षिणात्य हिट चित्रपटांमधील गाणी गायिली आहेत.

सलमान अलीने इंडियन आयडॉलचे पर्व १०वे गाजवले होते. तोच या पर्वाचा विजेता ठरला. तो सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. त्याला बॉलीवूडचा भाईजान अर्थात सलमान खानने आपल्या दबंग 3 या चित्रपटात गाण्याची संधी दिली. तो सध्या लाईव्ह शोच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या भेटीला येत असतो.

एक सामान्य बुटपॉलिश करणारी व्यक्ती इंडियन आयडॉलच्या ११व्या पर्वाचा विजेता ठरला. ती व्यक्ती म्हणजे गायक सनी हिंदुस्तानी. शो जिंकल्यानंतर त्याला अनेक गाण्यांचा ऑफर्स येऊ लागल्या आहेत. पण शो सुरु असतानाच त्याने कंगना राणावतच्या पंगा या चित्रपटासाठी देखील गाणे गायले होते.