टीम इंडियाचा ‘विराट’ विजय

जमैका: सलग दोन सामन्यात पराभव पत्कारावा लागलेल्या टीम इंडियाने वेस्ट इंडिजला घरच्या मैदानावर चारी मुंडया चीत केले. तिरंगी मालिकेतील पहिला विजय मिळवीत मालिकेतील आव्हान टीम इंडियाने कायम ठेवले आहे. कर्णधार विराट कोहलीच्या दमदार शतकाच्या जोरावर टीम इंडियाने १०२ धावांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयासह टीम इंडियाने बोनस पॉइंटचीही कमाई केली आहे.

या सामन्यात नाणेफेक जिंकून टीम इंडियाला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण देण्याचा निर्णय, विंडीजच्या चांगलाच आंगलट आला. कर्णधार विराट कोहली हा भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला. कोहलीच्या दमदार १०२ धावांच्या जोरावर, भारताने विंडिजसमोर ७ बाद ३११ धावांचा डोंगर उभारला. सलामीला आलेल्या शिखर धवनने आणि रोहित शर्माच्या जोडीने १२३ धावांची भागीदारी रचत, संघाला मजबूत सुरुवात करुन दिली. त्यात रोहितच्या ४६ आणि शिखर धवनच्या ६९ धावांचा वाटा होता.

हे आव्हान घेवून मैदनात उतरलेल्या विंडीज संघाची सुरूवात खराब झाली. गेल लगेचच परतल्याने पहिल्या दहा षटकात २ गडी बाद ५७ धावा झाल्यास असताना पाउस आला. त्यामुळे काहीकाळ खेळ थांबला होता. पावसाने व्यत्यय आणल्यामुळे विंडिजला ३९ षटकांत २७४ धावांचे सुधारित लक्ष्य देण्यात आले. टीम इंडियाने हे आव्हान विंडिजला पेलवले नाही. भारताच्या भेदक गोलंदाजीसमोर विंडिज टीम ३४ षटकांत १७१ धावांतच गारद झाली. पण ईशांत भुवनेश्वर आणि उमेश यादवच्या भेदक मा-यासमोर विंडीजच्या फलंदाजांनी अक्षरश: नांगी टाकली. भुवनेश्वार कुमार आणि उमेश यादवने प्रत्येकी तीन तर ईशांत आणि जाडेजाने प्रत्येकी दोन विकेट घेत टीम इंडियाला विजयश्री मिळवून दिली. तिरंगी मालिकेची फायनल गाठायची असेल तर टीम इंडियाला आपला हाच फॉर्म श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात टिकवावा लागणार आहे.