सांगली: सांगली-मिरज-कुपवाड महापालिका निवडणुकीची मतमोजणी सोमवारी सकाळपासून सुरू झाली. या निवडणूकीचे निकाल येण्यास सुरूवात झाली आहे. सुरुवातीच्या निकालात काँग्रेसने ३९ जागांवर विजय मिळवत बहूमत मिळवले आहे. तर सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस ११ जागा मिळवत पिछाडीवर पडली आहे.
रविवारी सांगली महापालिकेच्या ७८ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. मात्र काल मतदानादिवशीच काँग्रेस उमेदवाराचा मृत्यू झाल्याने, ७७ जागांसाठी मतदान झाले. त्यामुळे ३७ प्रभागांतील ७७ जागांसाठी तब्बल ४२२ उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
मतमोजणी सकाळी दहा वाजता सुरू झाल्यानंतर सुरूवातीपासून र्कॉग्रेसच्या उमेदवारांनी आघाडी घेतली. दुपारी १ वाजेपर्यंत ६० जागेचे निकाल लागले आहेत. त्यामध्ये काँग्रेसने ३९ जागांवर विजय मिळवत बहूमत मिळवले आहे. तर सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस ११ जागा याशिवाय शिवसेना – भाजप, स्वाभिमानी शेतकरी संघटना, रिपाइं यांच्या स्वाभिमानी विकास आघाडीला ७ जागा तर अपक्ष तीन जागी विजयी झाले. अजून १६ जागेचा निकाल येणे बाकी आहे.