२४ लाख भारतीयांना अमेरिकन नागरिकत्व मिळणार

वॉशिग्टन दि.२८ – अमेरिकन इमिग्रेशन सुधारणा विधेयक सिनेटने संमत केल्याने त्याचा फायदा २४ लाख भारतीयांसह अमेरिकेत अवैध रहात असलेल्या जगभरातील सुमारे १ कोटींहून अधिक लोकांना अमेरिकेचे नागरिकत्व मिळण्यासाठी होणार आहे. अर्थात सिनेटने हे विधेयक संमत केले असले तरी त्याचे कायद्यात रूपांतर होण्यास कांही वेळ लागणार आहे.

सिनेटने संमत केलेले हे विधेयक कायदा होण्यासाठी अध्यक्ष बराक ओबामा यांच्याकडे पाठविण्यापूर्वी त्यावर प्रतिनिधी सभेत विचार विनिमय आणि चर्चा केली जाणार आहे. या विषयी राष्ट्राध्यक्ष ओबामा म्हणाले की हे विधेयक कायद्यात रूपांतरीत झाले की अमेरिकेत अवैधरित्या राहात असलेल्या १ कोटींहून अधिक लोकांना अमेरिकेचे नागरिकत्व दिले जाईल आणि येथील सर्वसामान्य नागरिकांचेच सर्व नियम म्हणजे कर भरणे. आरोग्य सुविधा, आयकर यासारखे सर्व नियम त्यांनाही लागू होतील.

नव्याने होणार्‍या नागरिकांमुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेचा विकास होईल अणि परिणामी अमेरिकेची आर्थिक तूट कमी होण्यासच त्याची मदत होईल अशी आशा ओबामा यांनी व्यक्त केली आहे.