कोलकत्ता – परदेशातून येणार्या माशांच्या मागणीला बळी पडून भारतातल्या मच्छिमारांनी ३० दुर्मिळ प्रजातींच्या १५ लाख माशांची निर्यात केली आहे. गेल्या सात वर्षामध्ये ही निर्यात झाली असून तिच्यामुळे भारताच्या समुद्रातील जैविक विविधतेला मोठी बाधा आलेली आहे, अशी माहिती कोचीन येथील पर्यावरण तज्ज्ञ राजीव राघवन यांनी दिली आहे. भारतातल्या समुद्राच्या पाण्यात हजारो विविध जातींचे मासे आहेत आणि बाहेरच्या देशातील मत्स्यालयांचे संचालक भारतातून या माशांची मागणी करत असतात. त्यातून मिळणार्या पैशांच्या लोभापायी भारतातून ५० लाख मासे बाहेर देशात पाठविण्यात आले आहेत.
भारतातून दुर्मिळ माशांची निर्यात
या निर्यातीत दुर्मिळ प्रजातींच्या १५ लाख माशांचा समावेश आहे. त्यातील बोटिया स्ट्रियाटा ही माशांची जात जवळजवळ नष्ट होत आलेली आहे. अशाच प्रकारे रेड लाईन्ड् टॉर्पेडो बार्बस् ही सुद्धा नष्ट होत चाललेली जात आहे. त्याशिवाय केरिनोट्रेट्राओडन ट्रॅव्हॅनकोरिकस् ही सुद्धा एक धोक्यात आलेली जात आहे. परंतु या जातीचे मासे आकर्षक दिसत असल्यामुळे परदेशातून त्यांना चांगली मागणी येते आणि भारतातले मच्छिमार पैशासाठी म्हणून त्यांची निर्यात करतात. या जाती दुर्मिळ असल्यामुळे परदेशातले मत्स्यालयांचे मालक त्यांच्यासाठी वाट्टेल तेवढा पैसा द्यायला तयार असतात आणि त्याचा गैरफायदा भारतातले मच्छिमार घेतात.
मत्स्यालयाचा व्यवसाय भारतातल्या २२ प्रकारच्या माशांच्या मुळावर उठलेला आहे. जर्मनी आणि सिंगापूरमध्ये भारतातल्या या माशांना मोठी मागणी असते. हॉंगकॉंग, मलेशिया याही देशातील पर्यटन व्यावसायिक आपल्या पर्यटन स्थळांचे आकर्षण वाढावे यासाठी मत्स्यालये स्थापन करतात आणि ती आकर्षक व्हावीत यासाठी जगभरातून विविध प्रकारचे आकर्षक मासे चोरट्या मार्गाने, बेकायदारित्या आयात करत असतात. पण अशा चोरट्या व्यापारामुळे भारतातल्या काही दुर्मिळ जाती यापुढे भारतातल्या समुद्राच्या पाण्यात बघायला सुद्धा मिळणार नाहीत इतकी वाईट अवस्था आली आहे.
