भारतात होणार आणखी 4 कोरोना प्रतिबंधक लसींचे उत्पादन


नवी दिल्ली : देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून मोठी पावले उचलली जात आहेत. मागील आठवड्यातील कोरोनाबाधितांची आकडेवारी पाहता, कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे दिसून येत आहे. सर्व नागरिकांचे लसीकरण करण्याचा प्रयत्न केंद्र सरकारकडून केला जात आहे. त्यातच आता पुढील काही महिन्यात देशात आणखी 4 कोरोना प्रतिबंधक लसी उपलब्ध होतील, असे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटले आहे.

याबाबत माहिती देताना नीति आयोगाचे सदस्य डॉ. वीके पॉल यांनी म्हटले आहे की, देशातील लसींचे उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. येत्या काही महिन्यात भारतात आणखी 4 लसी उपलब्ध होणार आहेत. त्यामध्ये बायो-ई ची लस, जायडसची डीएनएवर आधारित लस, भारत बायोटेकची नेजल व्हॅक्सिन आणि जिनेवाची लस यांचा समावेश असेल.त्यांनी सांगितले की, 2021 च्या अखेरपर्यंत देशात 200 कोटी लसीचे उत्पादन झालेले असेल.

डॉ. पाल यांनी म्हटले की, कोविड सुरक्षा स्किमअंतर्गत सरकारने जायडस कॅडिला, बायो ई आणि जिनवाच्या कोरोना लसींची देशातच निर्मिती करण्यात येणार आहे. त्यासाठी नॅशनल लॅबच्या अंतर्गत त्यांना टेक्निकल सपोर्ट देण्यात येणार आहे. भारत बायोटेकच्या नाकातून दिल्या जाणाऱ्या सिंगल डोस लसीसाठी केंद्र सरकार अनुदान देत आहे. या सर्व लसी मेड इन इंडिया असणार आहेत.

स्पुटनिक व्ही या लसीच्या टेक्नोलॉजी ट्रान्सफरबाबतची प्रक्रिया भारतीय कंपन्यांनी पूर्ण केली आहे. नीति आयोगाचे सदस्य रशियन सरकारच्या संपर्कात आहेत. डॉ. रेड्डीज लॅबच्या सहयोगाने इतर 6 कंपन्यांनी स्पुटनिक व्ही चे उत्पादन भारतात करण्याविषयी प्रयत्न करण्यात येणार आहे.