स्नोडेनला सोपविण्यास पुतीन यांचा नकार

मास्को दि.२६ – अमेरिकेच्या राष्ट्रीय संरक्षण संस्थेतील सर्व्हेलन्स कागदपत्रे वर्तमानपत्रांना देऊन अमेरिकेतून पलायन केलेल्या स्नोडेनला अमेरिकेच्या ताब्यात देण्याची ओबामा प्रशासनाने केलेली मागणी रशियाचे अध्यक्ष ब्लादीमीर पुतीन यांनी फेटाळून लावली आहे. अमेरिका आणि रशियात गुन्हेगार प्रत्यार्पणाचा करार झालेला नाही आणि रशिया असा करार ज्या देशांशी झाला आहे त्यांनाच प्रत्यार्पण करते असेही पुतीन यावेळी म्हणाले. स्नोडेनसंदर्भात आम्ही कोणताही कायदा भंग केलेला नाही. अमेरिकेचा कायदा भंगाचा आरोप धादांत खोटा आहे असेही पुतीन यांनी सांगितले.

स्नोडेनने हाँगकाँगमधून मास्कोच्या विमानतळावर मुक्काम ठोकला आहे. पुतीन म्हणतात की तो रशियात आलेला नाही तर मास्को विमानतळावर ट्रांझिट झोनमध्ये आहे. त्यामुळे त्याला व्हीसा अथवा अन्य कागदपत्रांची गरज नाही. त्याने आमच्या भूमीवर कोणताही गुन्हा केलेला नाही त्यामुळे तो स्वतंत्र व्यक्ती म्हणूनच तेथे आहे. त्याला हवे असेल तेव्हा विमानाचे तिकीट काढून तो कुठेही जायला मोकळा आहे. हा निर्णय तो जेवढ्या लवकर घेईल तेवढे त्याच्या आणि आमच्याही सोयीचे आहे.

स्नोडेन इक्वेडोरमध्ये राजकीय आश्रय घेण्याच्या प्रयत्नात असून त्यासाठी तो क्युबाला जाणार होता. मात्र अद्यापी तो मास्को विमानतळावरच आहे असे समजते.