उत्तराखंडातील संकटाच्यावेळी आपद्ग्रस्तांच्या मदतीसाठी अनेक जण धावून गेले. परंतु त्यांनी केलेल्या मदतकार्यात सुद्धा राजकारण सुरू झाले आहे, ही गोष्ट दुर्दैवाचीच म्हणावी लागेल. देशावर एवढे मोठे संकट आले असताना राहुल गांधी परदेशात होते. त्यांना परदेश दौरा अर्धवट सोडून यावेसे वाटले नाही, याची वाच्यता भाजपाच्या नेत्यांनी अनेकवेळा केली. काही दिवसांनी राहुल गांधी परतले, परंतु ते उत्तराखंडाकडे गेलेच नाहीत. त्यांनी दिल्लीतून उत्तराखंडकडे जाणार्या कॉंग्रेसच्या मदतीच्या गाड्यांना हिरवा आणि तिरंगी झेंडा दाखवून त्या गाड्या तिकडे रवाना केल्या. कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ही सारी मदत राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या कृपेनेच जमा झाली आहे, असे सांगितले आणि राहुल गांधी या संकटसमयी धावून आल्याचा देखावा निर्माण झाला. नरेंद्र मोदी यांनी स्वत: उत्तराखंडात जाऊन केलेली मदत आणि राहुल गांधींचा हा देखावा यामध्ये खूप फरक आहे. पण त्याची चर्चा आता एका मर्यादेपेक्षा अधिक होता कामा नये. कारण ही वेळ संकटाची आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी डेहराडूनमध्ये तळ ठोकून तिथे मराठी भाविकांच्या मदतीचे प्रयत्न सुरू केले. परंतु महाराष्ट्रात प्रत्येक गोष्टीत होत असते तसे राजकारण तिथेही झालेच.
आता तरी राजकारण नको?
महाराष्ट्रात कोणत्याही योजनेत, निर्णयात राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस या दोन पक्षांमध्ये तू तू मैं मैं होतच असते. पण आता तरी निदान तसा प्रकार घडू नये याची दक्षता घ्यायला हवी होती. तसे झाले नाही. नवे पुनर्वसन मंत्री सुरेश धस हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आहेत आणि ते उत्तराखंडातील मराठी भाविकांच्या मदतीसाठी तत्परतेने धावून गेले. याबाबत मुख्यमंत्र्यांना काही प्रश्न विचारले असता त्यांनी, मा. सुरेश धस हे पर्यटनासाठी तिकडे गेले आहेत असे मोठे विचित्र उत्तर दिले. खरे म्हणजे मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याशी संपर्क साधायला हवा होता आणि दोघांनी समन्वयाने काम करून तिथले मदतकार्य चालवायला हवे होते. मात्र सुरेश धस यांनी आधी राजकारण सुरू केले. त्यांनी मुख्यमंत्र्यांना कसलीही कल्पना न देताच डेहराडून गाठले आणि ते तिथे जे काही काम करतील ते मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली केलेले नसेल असे भासविण्याचा त्यांनी प्रयत्न केला. एकंदरीत या दोन पक्षांमध्ये परस्परांवर कुरघोडी करण्याचे सुरू असलेले प्रयत्न या संकटाच्या वेळी सुद्धा थांबले नाहीत. या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांचे काम मात्र सर्वांचे लक्ष वेधून गेले.
नरेन्द्र मोदी यांनी आपल्या काही खास अधिकार्यांसह उत्तराखंडात येऊन तिथे अडकून पडलेल्या १५ हजार लोकांची सुटका करून त्यांना आपल्या आपल्या घरी पोचवण्याची सोय केली. त्यासाठी त्यांनी गुजरातमधून स्वतंत्रपणे १५०० इनोव्हा कार आणल्या होत्या आणि स्वत:ची विमाने वापरली होती. ही बातमी अनेक माध्यमांनी दिली. सध्या माध्यमांना मोदी हा सदोदित बातमीचा विषय झाला आहे. तेव्हा मोदी यांनी काहीही केले अथवा न केले तरीही त्याची बातमी कौतुकाने देण्याकडे त्यांचा कल असतो. याही बातमीचे असेच झाले. त्यांनी उत्तराखंडात येताना कसलीही स्वतंत्र व्यवस्था नाकारली वगैरे त्यांचे कौतुक झाले पण त्याचवेळी महाराष्ट्राच्या सरकारनेही अशीच सोय केली आहे. मोदी तिथे येण्याच्या आधी महाराष्ट्राची यंत्रणा तिथे पोचली होती आणि महाराष्ट्राच्या अधिकार्यांनीही आपली स्वतंत्र यंत्रणा उभारून आपल्या राज्यातल्या पर्यटकांना वाचवले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे अजूनही डेहराडून येथे तळ ठोकून आहेत. महाराष्ट्राच्या अधिकार्यांच्या गटानेही वाखाणण्याजोगी कामगिरी केली आहे. त्याची म्हणावी तेवढी दखल माध्यमांनी घेतली नाही ही दुदैंवाची बाब आहे. याही बाबतीत सतत प्रकाशाच्या झोतात राहण्याची मोदी यांची युक्ती फलदायी ठरली. पृथ्वीराज चव्हाण यांनी मात्र प्रसिद्धीपेक्षा कामावर भर दिला.
आता आता तिथे माध्यमांचे प्रतिनिधी पोचले असून त्यांनी तिथले जिवंत चित्रण पाठवायला सुरूवात केल्याने परिस्थिती किती गंभीर होती याची कल्पना लोकांना यायला लागली आहे. राज्यातल्या यंत्रणांनी तर काम केलेच पण लष्कराने सर्वात उत्तम काम केले. लष्करातले जवान जीवाची बाजी लावून लोकांना वाचवत आहेत हेही लोकांनी पाहिले. या भीषण आपत्तीतून बचावलेल्या अनेक भाविकांनी लष्कराची तोंड भरून स्तुती केली. राज्याच्या यंत्रणेत मात्र अनेक दोेष आढळले. केवळ उत्तराखंडातच नाही तर देशातल्या अनेक राज्यांत आपत्ती निवारण व्यवस्थापनाची अवस्था अशीच आहे. राज्या राज्यात पूर, वादळ, अशी संकटे कमी जास्त प्रमाणात दरसाल येत असूनही त्या त्या राज्यातल्या यंत्रणा सावध नसतात असेच आढळते. अनेक लोक अडकले आहेत आणि त्यांना अन्न पाणी मिळाले नाही हे समजल्यावर सामाजिक संस्था सावध झाल्या आणि त्यांनी लंगर सुरू केले. आपल्या सामाजिक संघटना सरकारी यंत्रणांपेक्षा सावध आहेत आणि कर्तव्य बजावल्यागत काम करीत आहेत असे दिसले हेही दृश्य समाधान देऊन गेले. गेल्या १६ तारखेपासून हतबल मानवाची प्रबळ निसर्गाशी सुरू असलेली झुंज आता एका टप्प्यापर्यंत येऊन थांबली आहे. पण या टप्प्याने सुद्धा आपल्याला बर्याच गोष्टी शिकविल्या आहेत.
