आपली बेधडक व बेताल वक्तव्ये आणि अर्धनग्नावस्थेतील छायाचित्रे यामुळे नेहमीच वादग्रस्त ठरणारी बॉलीवूडची बिनधास्त बाला पूनम पांडेला आता बहुधा या सगळय़ांचा वीट आला आहे. संधी मिळेल तिथे अंगावरचे कपडे उतरविण्यास तयार होणार्या पूनमने आता चक्क सोज्वळ होण्याचे मनावर घेतले आहे. यासाठी तिने आपली बोल्ड व बिनधास्त प्रतिमा बदलण्याची इच्छा व्यक्त केली आहे. वेगळय़ा प्रकारच्या भूमिका स्वीकारून या प्रतिमेच्या जोखडातून बाहेर पडण्याचा प्रयत्न ती करणार आहे.
पूनमला बदलायचीय बोल्ड इमेज
पूनम सांगते की, सुरुवातीपासून एक बोल्ड अभिनेत्री अशीच माझी प्रतिमा तयार झाली आहे. त्यामुळे सगळय़ांना असे वाटते की, भविष्यातही मी फक्त तसल्याच चित्रपटांतून काम करेन. मात्र असे अजिबात नाही. मला वैविध्यपूर्ण भूमिका करण्याची इच्छा आहे. मी फक्त भडक व उत्तेजक भूमिका असलेल्या चित्रपटांसाठी बनलेली नाही. मलाही अन्य अभिनेत्रींप्रमाणे वेगवेगळय़ा धाटणीच्या भूमिका करण्याची इच्छा आहे. नशा या माझ्या पहिल्याच चित्रपटात माझे पात्र बोल्ड महिलेचे असले तरी त्याहून वेगळय़ा प्रकारच्या भूमिका पेलण्यासही मी सक्षम आहे. अर्थात याबाबत फारसा विचार करू इच्छित नाही. सध्या माझे सगळे लक्ष्य नशावर केंद्रित आहे, हे सांगण्यासही ती विसरली नाही. पूनमच्या आगामी नशा चित्रपटात एका १८ वर्षांच्या तरुणाची कथा असून तो आपल्यापेक्षा मोठय़ा वयाच्या महिलेवर प्रेम करतो. या महिलेची भूमिका पूनमने साकारली असून त्यामध्ये तिने अतिशय भडक दृश्ये दिली आहेत. हा चित्रपट येत्या २६ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
