कर्नाटकातील हुबळी येथे २६ वर्षीय महिलेच्या प्रसूतीच्या काळात तिला ओ पॉझिटिव्ह रक्त दिले गेले. त्या रक्ताचा तिला उपयोग झाला. दोन वर्षांनी तिच्यावर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करण्यासाठी म्हणून तिला एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि शस्त्रक्रिया करण्यापूर्वी तिच्या रक्ताची तपासणी केली असता ती एचआयव्हीग्रस्त असल्याचे आढळून आले. तिला आणि तिच्या कुटुंबाला या तपासणीचा निष्कर्ष ऐकून प्रचंड धक्का बसला. तिच्या पतीला एचआयव्हीची बाधा नव्हती. त्यामुळे विवाहबाह्य संबंधातून तिला एचआयव्हीची बाधा झाली असण्याची शक्यताच नव्हती. प्रसूतीच्या काळात तिला दिलेल्या ओ पॉझिटिव्ह रक्तातून तिला एचआयव्हीची बाधा झाली होती. ज्या रक्तपेढीतून ते रक्त आणले होते तिथे जाऊन चौकशी केली, तेव्हा ते रक्त घेताना आणि पुरवताना त्याची एलिझा टेस्ट केली होती आणि ती करताना त्या रक्तदात्याला एचआयव्हीची बाधा झालेली नाही, हे सिद्ध झाले होते.
रक्ताच्या चाचण्या नव्या तंत्राने करा
एवढे असूनही त्या महिलेला एचआयव्हीची बाधा कशी झाली, याची उकल आता केली गेली आहे. एलिझा टेस्ट घेण्याच्या १५ दिवस आधी त्या व्यक्तीला एचआयव्हीची बाधा झाली असेल तरच ती एलिझा टेस्टमध्ये दिसून येते. मात्र टेस्ट घेण्याच्या आठ दिवस आधी किंवा चार दिवस आधी त्याला एचआयव्ही बाधा झाली असेल तर ती एलिझा टेस्टमध्ये दिसत नाही आणि नेमकी त्याच काळात त्याला ती बाधा झाली असल्यामुळे ती रक्ताच्या चाचणीत दिसली नाही, पण प्रत्यक्षात त्याचे रक्त एचआयव्हीबाधित होते.
आता एक नवी रक्ताची चाचणी शोधून काढण्यात आलेली आहे. तिला इनडिज्युवल डोनर न्यूक्लिक ऍसिड टेस्टिंग (आय-डी नॅट) असे म्हटले जाते. या चाचणीत रक्त देणार्याला तीन दिवसांपूर्वी एचआयव्ही बाधा झाली असली तरी ती चाचणीत दिसून येते. म्हणजे ही पद्धत निरनिराळ्या रोगजंतूंचा रक्तातील आढळ शोधून काढण्यासाठी प्रभावी पद्धत आहे. तिच्यासाठी एलिझा टेस्टपेक्षा ३०० रुपये जास्त लागतात. परंतु कर्नाटकातील त्या महिलेच्या आयुष्यात जशी धक्कादायक घटना घडली तशी घटना घडण्याचे टळते. आता काही निवडक शहरांमध्ये ही चाचणी उपलब्ध आहे.
