टोरंटो दि.२२ – अमेरिकेच्या माजी परराष्ट्र सचिव हिलरी क्लिंटन यांनी येथील महिला परिषदेत बोलताना अमेरिकेत महिला प्रसिडेंट झालेली पाहणे आपल्याला मनापासून आवडेल आणि अमेरिकन नागरिकही त्या दृष्टीने विचार करून महिला प्रेसिडेंटला निवडून देतील अशी आशा व्यक्त केली आहे. महिला प्रेसिडेंट झाली तर तर एक्झॅक्ट द राईट हिस्टोरिकल सिग्नल जगभरात जाईल असे सांगताना पुरूष, महिला आणि मुलांसाठी हा संदेश महत्त्वाचा ठरेल असेही सांगितले. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला पत्रकारांना बंदी करण्यात आली होती.
हिलरी यावेळी बोलताना म्हणाल्या की महिलांनी राजकारणात उतरणे हे फार गरजेचे आहे. राजकारणात काम करण्याचे धाडस दाखविणे, स्पर्धेत हिरीरीने लढणे ही काळाचीच गरज असून अमेरिकेनेही ही विश्वासाची झेप घेणे आवश्यक आहे. माझ्या आयुष्यात अमेरिकेवर महिला प्रेसिंडेंट यावी अशी इच्छा आहे. कदाचित ती २०१६ साली येईल किवा २०२० साली येईल.
राजकारण महिलांसाठी अवघड असले तरी अशक्य नाही. महिला त्यासाठी किती तयारी दाखवितात, राजकीय प्रक्रेयेत कशा सामील होतात हे पाहणे मनोरंजक असेल असे सांगून आपला निवृत्तीचा काळ आनंदात चालला असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र सध्या विविध कामांत गुंतल्याचे, देशातील विविध गटांशी चर्चा सुरु असल्याचे तसेच माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या फौंडेशनचे कामही पाहात असल्याचे हिलरी म्हणाल्या.
वॉर चाईल्ड कॅनडा या स्वयंसेवी संस्थेच्या संस्थापक समंथा नट यांनी हिलरी यांची मुलाखत घेतली तेव्हा विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना हिलरी यांनी महिला प्रेसिडेंटपदासाठी असेल तर तिला नक्कीच मत देईल असे सागितले. तुम्ही प्रेसिडेंटपदाची निवडणक लढविणार का याचे उत्तर टाळतानाच हिलरी यांनी महिलांकडे नेतृत्त्व गेले तर ते पुरूष नेतृत्त्वापेक्षा नक्कीच वेगळे असेल असे सांगितले. यावेळी माजी फर्स्ट लेडी रूझवेल्ट यांचे उदाहरण देताना राजकारणात येताना महिलांना कातडी गेंड्याची करूनच उतरावे लागेल अशीही टिपण्णी केली.
२००८ साली ओबामाना निवडून अमेरिकेने पहिला काळा प्रेसिडेंट देण्याचा विक्रम नोंदविला आहे आता पहिली महिला प्रेसिडेंट देऊन दुसरा विक्रम करण्याची संधी अमेरिकनांना आहे असेही यावेळी त्या म्हणाल्या.