उत्तराखंडमधील ७४ जणांचे पथक मुंबईत दाखल

मुंबई – उत्तराखंडमध्ये आलेल्या महाप्रलयातून बालबाल बचावलेल्या मुंबईतील ७४ जणांचे एक पथक शनिवारी मुंबई सेंट्रल येथे पोहचले. सकाळी साडेआठ वाजता हे सर्वजण राजधानी एक्स्प्रेसने मुंबई सेंट्रल येथे पोहचले. राज्यात दाखल होणारे हे पहिलेच पथक आहे.

या पथकाने रविवार, १६ जूनच्या पहाटे मुसळधार पाऊस होण्याआधीच केदारनाथ सोडले होते. खरेतर ते रविवारीही केदारनाथमध्ये राहण्याचा विचार करत होते. पण, बद्रिनाथला सकाळी पोहोचून दर्शन घेऊ, या विचाराने ते शनिवारी रात्रीच बद्रिनाथच्या दिशेने निघाले व पुढील अनर्थ टळला. केदारनाथला भेट देणारे आणि तिथून निघणारे हे शेवटचे पथक होते.

१५ जूनला या पथकाने दिवसभर थकल्यामुळे शनिवारची रात्र तेथेच काढण्याचे ठरविले होते. पण, बद्रिनाथला जाणे गरजेचे होते. त्यामुळे रात्री उशिरा निघण्याचा निर्णय झाला. सर्वानी त्याला सहमती दिली. त्यानंतर हे सर्वजण बद्रिनाथच्या दिशेने रवाना झाले आणि उत्तराखंडमध्ये जणू ढगफूटीच झाली. केदारनाथ अक्षरश: वाहून गेले. अनेक लोक अजूनही बेपत्ता आहेत. ही परिस्थिती समजल्यानंतर केवळ दैव बलवत्तर म्हणून बचावलो, अशी सर्व पथकाची प्रतिक्रिया होती.

बद्रिनाथला पोहोचण्यासाठी ९ किमीचे अंतर शिल्लक होते. त्याचवेळी रस्त्यावर दरड कोसळली होती. रस्ताच वाहून गेला होता. किर्र जंगल आणि त्यात अडकलेल्या गाडय़ा असे चित्र होते. त्यानंतर जवळच असलेल्या पिंपल कोटी या गावात जाण्याचा त्यांनी निर्णय घेतला. पण वाहतुकीची प्रचंड कोंडी झाल्याने काही अंतरावरच असलेल्या गावात पोहोचण्यासाठीही २३ तास लागले. तेवढा वेळी गाडीत सर्वजण ताटकळत बसले होते. आता त्या ठिकानाहून सुटका झाल्याने हे पथक शनिवारी मुंबई सेंट्रल येथे पोहचले.