उत्तराखंड- उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या मुसळधार राज्यातील सुमारे ८० गावे उद्ध्वस्त झाली असून राज्यातील पाचशे गावे वाहून गेल्याची शक्यता आहे. आतापर्यंत दीडशे मृतदेह हाताशी लागले असले तरी मृतांची संख्या हजाराहून अधिक असल्याची माहिती केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सूत्रांनी दिली आहे.देवभूमी असलेल्या रुद्रप्रयाग ते केदारनाथपर्यंत सर्व ठिकाणी महाप्रलयाने हाहाकार माजला आहे. उत्तराखंडमधील जीवितहानी आणि वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाल्याचे आपत्ती निवारण केंद्राने गृह मंत्रालयात सादर केलेल्या अहवालात व्यक्त केली आहे.
केदारनाथमधील ६० गावांमधून अद्याप काहीही माहिती मिळालेली नाही तर तिथल्या ९० धर्मशाळांमध्ये हजारो भाविक होते. त्यातल्या अनेक भाविकांचा अजूनही पत्ता लागलेला नाही. काली कमली धर्मशाळा, भारत सेवा आश्रम आणि गढवाल विकास मंडळाचे एक हॉटेल उद्ध्वस्त झाले आहे. या तिन्ही धर्मशाळांमध्ये हजारो नागरिक होते तसेच परिसरातील रामबाडा बाजारही पुरात वाहून गेला आहे. आजूबाजूच्या छोट्या गावांमध्ये अद्यापही मदत पोहोचू शकलेली नाही. त्यामुळे मृतांचा आकडा काही हजारांमध्ये जाण्याची शक्यता आहे.
उत्तराखंडच्या प्रकोपातील हजारो बेपत्ता लोकांचा शोध घेण्याच्या हालचालींना वेग आला आहे पण सततचा पाऊस आणि दरडी कोसळणे सुरू असल्याने बचावकार्यात अडथळे येत आहेत. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कैलास मानसरोवर यात्राही वर्षभरासाठी रद्द करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान उत्तराखंडमध्ये सरासरीपेक्षा ४५० टक्के अधिक पाऊस झाला आहे. पावसानंतर सगळीकडे गाळाचे साम्राज्य पसरले असून या महाप्रलयात सुमारे २०० कार, दोन जेसीबीही वाहून गेल्याचे समजते तसेच परिसरातील रस्त्यांवरील पूलही वाहून गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. केदारनाथमध्ये सर्वांधिक फटका बसला आहे. स्थानिक प्रशासनाच्या सूत्रांनुसार आतापर्यंत १९ हजारांहून अधिक लोकांना वाचविण्यात यश आले आहे परंतु अजून सुमारे ६२ हजार नागरिक उत्तराखंडमधील विविध जिल्ह्यांत अडकले आहेत.