स्वीस बँकेत भारतीयांच्या पैशाचे प्रमाण घटले

झुरीच दि.२१- स्वीस बँकांतून ठेवण्यात आलेल्या भारतीयांच्या पैशात या वर्षात लक्षणीय घट झाली असून १४ हजार कोटींवरून हा पैसा आता ९ हजार कोटींवर आला असल्याचे स्वीस नॅशनल बँकेने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीवरून दिसून आले आहे. स्वीस बँकात ठेवण्यात आलेल्या परदेशी व्यक्तींच्या पैशांबाबत माहिती उपलब्ध करून दिली जावी यासाठी या बँकांवर यूएस तसेच अन्य देशांकडून दबाव येत असल्याने गुप्तता बाळगण्यात नंबर वन असलेल्या या बँका आता ग्राहकांसाठी फारशा आकर्षक राहिलेल्या नसल्याचेही सांगितले जात आहे.

स्वीस बँकांमध्ये सध्या अधिकृतरित्या असलेला वैयक्तीक अथवा संस्थांचा पैसा १.३४ बिलियन स्वीस फ्रँक इतका असून खोट्या नावांनी ठेवलेला पैसा ७७ दशलक्ष स्वीस फ्रँक इतका असावा असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. ही आकडेवारी २०१२ अखेरची आहे. बँकेच्या वार्षिक अहवालानुसार अधिकृत  रक्कम ४९०० कोटींच्या दरम्यान असून ती ९.१ टकयांनी घटली आहे. यात खोट्या नावाने ठेवल्या गेलेल्या रकमेचा समावेश नाही २०१२ च्या सुरवातीला हा आकडा १४ हजार कोटी (२.१८ बिलीयन स्वीस फ्रँक) इतका होता.

स्वीस बँकेत भारतातून पाठविण्यात आलेल्या रकमांत सर्वाधिक रक्कम २००६ साली होती व हा आकडा होता ४१ हजार कोटी. त्यानंतर ही रक्कम घटून ३२ हजार कोटींवर आली होती. गतवर्षी काळ्या पैशांसदर्भात केंद्राने सादर केलेल्या श्वेतपत्रिकेनुसार २००६-२०१० या काळात या बँकातील रक्कम १४ हजार कोटी दाखविली गेली होती.