
मुंबई, दि. 2१ (प्रतिनिधी) – पाटबंधारे खात्यातील 70 हजार कोटी रु. घोटाळ्यापेक्षा आघाडी सरकारमधील वीज घोटाळा प्रचंड मोठा असून महाजनको खत्यारीतील 10 प्रकल्प रेंगाळल्यामुळे 8616 कोटी रु. किंमत वाढल्याचा आरोप भाजप प्रदेश प्रवक्ते माधव भंडारी यांनी आज पत्रकार परिषदेत केला. आपण दर आठवड्याला एक असा वीज घोटाळा उजेडात आणू, असेही त्यांनी यावेळी जाहीर केले. हा सर्व खर्च बाहेरून वीज जास्त घेण्याच्या हव्यासातून वाढला. कारण प्रति एक युनिटमागे संबंधितांना 14 पैसे प्रमाणे कमिशन मिळते, ते सतत मिळत राहावे, म्हणून राज्याची निर्मिती क्षमता असतानाही प्रकल्प रखडवले जातात,
अशी धक्कादायक माहितीही त्यांनी दिली. महाजनको भांडार अधिकारीपदी असणारे सी. एस. थोटवे यांना पात्रता नसतानाही व निवड समितीचा अहवाल प्रतिकूल असतानाही कार्यकारी निर्देशक निर्मितीपदावर घेण्यात आले. परिणामी 23 हजार 120 कोटी रुपये खर्चाचे 4570 मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प रखडून त्यांचा
खर्च 8616 कोटींनी वाढला, असे ते म्हणाले.
