मास्को दि.२० – बराक ओबामा यांचा अण्वस्त्र कपातीचा प्रस्ताव रशिया गंभीरपणे घेणार नाही असे रशियाचे उपपंतप्रधान द्रिमित्री रोगोझीन यांनी स्पष्ट केले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी जर्मनीत बोलताना रशिया आणि अमेरिकेने अण्वस्त्र कपात केली जावी असा प्रस्ताव मांडल्यानंतर त्याला उत्तर देताना दिमित्री म्हणाले की अमेरिका स्वतः मिसाईल सिस्टीम विकसित करत आहे अशा वेळी रशियाला अण्वस्त्रे कपातीचा संदेश देणे उचित नाही.
अमेरिकेतील अण्वस्त्र वैज्ञानिक बुलेटीनमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीनुसार जगात सर्वाधिक अण्वस्त्रे रशियाकडे असून त्यांची संख्या आहे ८५००. अमेरिकेकडे ७७०० अण्वस्त्रे आहेत. या दोन देशांतील अण्वस्त्रांचे प्रमाण जगाच्या ९० टक्के इतके आहे. २०१३ च्या सुरवातीलाच रशियाकडे ८५०० अण्वस्त्रे आहेत त्यातील ४५०० सैन्यात सज्ज आहेत तर अन्य ४ हजार अण्वस्त्रे बाजूला केली गेली असली तरी नष्ट केली गेलेली नाहीत.
यापूर्वी २०१० मध्ये रशिया अमेरिकेने स्ट्रॅटिजिक आर्म्स ट्रिटीनुसार अण्वस्त्र कपातीच्या प्रस्तावाला मान्यता दिली होती.त्यावेळी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी ओबामाच होते तर रशियाच्या अध्यक्षपदी त्रिमली मेदवेदेव हे होते. आत्ताही ओबामा यांनी एक तृतीयांश अण्वस्त्रे कपातीचा प्रस्ताव मांडला आहे मात्र रशियाने त्याला मान्यता दिलेली नाही.