पाकमधील तुरुंगात अडकलेत 300 मच्छीमार

मुंबई, दि.19 – ठाणे जिह्यातील जवळपास 118 आदिवासींना पाकिस्तानी पोलिसांनी अटक करुन तुरुंगात डांबले होते. त्यातील 110 जणांची सुटका झाली आहे. तर 8 जण अद्यापही पाकिस्तानी तुरुंगात खितपत पडले आहेत. तर 43 आदिवासी मच्छिमार आतापर्यंत समुद्रात बुडून मरण पावले आहेत. तसेच सुटून
आलेल्या 110 जणापैकी 98 जणांना कोणतीही मदत मिळालेली नाही त्यामुळे या आदिवासींसमोर जीवन मरणाचा उभा राहिला आहे.

पालघर, डहाणू, तलासरी, विक्रमगड, या ठिकाणच्या मच्छीमारांना पोरबंदर आणि विरवळचे ठेकेदार गुजरात येथे मासेमारीसाठी घेवून जातात. यामध्ये त्यांना
दहा दिवस खोल समुद्रात मासेमारीसाठी रहावे लागते. या दरम्यान त्यांना गुजरात आणि पाकिस्तानची सीमा कळत नाही, त्यामुळे पाकिस्तानचे सैनिक ह्या
मच्छिमारांना पकडतात. यामधील काही मच्छीमार पाकिस्तानी तुरुंगातून सुटून आले आहेत. त्या लोकांकडून मिळालेल्या माहितीवरुन ठाणे जिल्हातील आणि गुजरात मधील 337 लोक तिथे बंदीवासात आहेत. मात्र गुजरात सरकार, गुजरात मधील पाकिस्तानी कैदेत असलेल्यांना आर्थिक मदत करते, तसे महाराष्ट्र सरकारकडून आपल्या लोकांना कुठलीही आर्थिक मदत मिळत नाही असा दावा भाजपाने केला आहे. गरीब आदिवासींना मदत देण्याच्या प्रश्नावर सरकार बेफिकीर दिसत असून याप्रकरणी वारवार पाठपुरावा केला, तरी सरकार याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला आहे.

याबाबत सांगताना भाजपाचे आमदार चिंतामण वनगा म्हणाले, की आम्ही या संदर्भात तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण, ठाण्याचे जिल्हाधिकारी व इतर सर्व संबंधितांशी पत्रव्यवहार केले आहेत. तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्यासमवेत बैठक घेऊनही मदत मिळवण्याबाबत प्रयत्न केले, पण शासकीय पातळीवर खूपच अनास्था दिसत आहे. त्याबाबत लवकरात लवकर कार्यवाही व्हावी, अशी मागणी आम्ही त्यावेळी केली. तसेच या मागणीचा गांभीर्याने विचार न झाल्यास या मच्छीमार आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबासह ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्राणांतिक उपोषण करण्याचा इशारा ही आम्ही दिला असल्याचे वनगा यांनी सांगितले.