पुणे, दि. 19 (प्रतिनिधी) – सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील 17 लोकांचा उत्तराखंडातील जोरदार पावसामुळे संपर्क तूटला असून, मागील पाच दिवसांपासून ते बेपत्ता आहेत. हरिद्वार येथून केदारनाथकडे निघेपर्यंत त्यांचा घरच्या लोकांशी संपर्क होता, अशी माहिती नातेवाईक गणेश गायकवाड यांनी दिली.
बार्शी येथून 5 जून रोजी भाविक उत्तर भारतात देवदर्शनाला निघाले होते. सर्वप्रथम त्यांनी काशी येथे भेट दिली. तेथून ते केदारनाथ आणि हरिद्वार येथे जाणार होते. संपर्क तुटलेले सर्व भाविक बार्शी तालु्नयातील पाथरी या गावचे रहिवासी आहेत. 15 जून रोजी त्यांनी मोबाइलद्वारे आपल्या कुटुंबीयांनी संपर्क केला होता. त्यावेळी ते हरिद्वारहून एका खासगी ट्रॅव्हल्सने केदारनाथकडे निघाले होते. केदारनाथ येथून 25 किलोमिटर अंतरावर आहोत, असेही त्यांनी आम्हाला फोनद्वारे कळविले होते, असे गायकवाड यांनी सांगितले.
परिचंद गायकवाड (वय 65), परिमला गायकवाड (60), अर्जुन गायकवाड (67), विजया गायकवाड (61), नानासाहेब गायकवाड (67), महानंदा गायकवाड (60), दामोदर गायकवाड (66), मंडोदरी गायकवाड(60), मधुकर विधाते (67), उल्पाबाई विधाते (60), सुवर्णा गायकवाड (37), बाबासाहेब गव्हाणे (63), सचिन पडवळ (31), रामभाउ पडवळ (38), कमल पडवळ (55), कबाई पडवळ (65), पुष्पा पडवळ (34) यांचा समावेश बेपत्ता भाविकांमध्ये असल्याचे गायकवाड यांनी सांगितले. या लोकांशी कोणत्याही प्रकारचा संपर्क झाल्यास 8605826956 किंवा 9922559038 या क‘मांकावर संपर्क साधावा असे अवाहन गायकवाड यांनी केले आहे.
उत्तरांखड येथे आलेल्या पूर स्थितीमुळे पुण्यातील 112 जण तेथे अडकले आहेत. त्यांच्या नातेवाईकांना तेथील स्थितीची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्कालीन कक्षात माहिती देण्याची सोय केलेली आहे. पुणे येथील आपत्कालीन कक्ष हे उत्तराखंड येथील कक्षाशी कायम संपर्कात आहे, अशी माहिती विभागीय आयु्क्त प्रभाकर देशमुख यांनी दिली.
———————-