
मुंबई – सध्या राज्याच्या राजकारणात मराठा आरक्षणाच्या प्रकरणी खळबळ सुरु आहे. एकीकडे राज्यपालांना आरक्षणाच्या प्रश्नाबाबत राज्य सरकारने निवेदन दिले आहे. तर दुसरीकडे यावरुन विरोधकांचे टीका करणे सुरुच आहे. भाजप नेते आशिष शेलार यांनी याच मुद्द्यावरुन आता सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत.
सर्वोच्च न्यायालयासमोर सरकारने नीट मांडले नाही मराठा आरक्षणातील महत्त्वाचे मुद्दे
त्यांनी यावेळी महाविकास आघाडीमध्ये सगळे हास्यास्पद सुरु असल्याची टीका केली आहे. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयासमोर मराठा आरक्षणातील महत्त्वाचे सरकारने मुद्दे नीट मांडले नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
मराठा समाजाची दिशाभूल करत समाजाला एप्रिल फूल कऱण्याचा कार्यक्रम करु नका, अशा शब्दात त्यांनी सरकारला खडे बोल सुनावले. त्याचबरोबर मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोच चव्हाण यांनी आरक्षणाचे जाऊद्या, सवलती द्या अशी भूमिका घेतली आणि काल मंत्री राज्यपालांची भेट घेताना आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा केली. या त्यांच्या भूमिकेमुळे आता तुम्हाला आरक्षण नक्की द्यायचे आहे की नाही असा प्रश्न निर्माण होत आहे. मराठा समाजामध्ये हे सरकार संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.
तसेच मराठा आरक्षणाबद्दलच्या गायकवाड अहवालाचे भाषांतर करण्यात न आल्यामुळे या अहवालातील प्रमुख मुद्दे योग्य पद्धतीने समोर आले नाहीत. त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिल्याचे ते म्हणाले. त्याचबरोबर महाविकास आघाडी सरकारमध्ये सुसूत्रता नसल्याची टीका त्यांनी यावेळी केली.
