भारतासाठी वॉटेन्ड हाफिज सईदला कोट्यावधीची अनुदाने

लाहोर दि. १९ – मुंबईवरील २००८ च्या दहशवादी हल्ल्याप्रकरणी भारतात मोस्ट वाँटेड असलेला जम उल दवा या लष्करे तैय्यबाच्या पॅरेंट संस्थेचा प्रमुख हफिज सईद याला पाकिस्तानच्या पंजाब राज्य सरकारने चालू अर्थसंकल्पात ६ कोटी १० लाख रूपयांचे अनुदान मंजूर केले आहे. पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री शाहवाज शरीफ यांनी विधानसभेत ही घोषणा केली असल्याचे समजते.

पंजाब प्रांताचे अर्थमंत्री मुज्ताबा रेहमान यांनी अर्थसंकल्पिय भाषण करताना जम उल दवाचे सर्वात मोठे केंद्र असलेल्या मस्कत ई तैय्यबा या संस्थेला नॉलेज पार्क उभारणीसाठी आणखी ३५० दशलक्ष रूपयांचे अनुदानही २०१३-१४ साठीच्या अर्थसंकल्पात मंजूर करण्यात आल्याचे सांगितले. यूएस सिक्युरिटी कौन्सिलने जम उल दवा सध्या बंदी असलेल्या लष्करे तैय्यबाचाच भाग असल्याचे आणि मुंबई हल्यात त्यांचाच सहभाग असल्याचे विधान पूर्वीच केले आहे. तेव्हाही पाकिस्तान पंजाब प्रांतात पाकिस्तान मुस्लीम लीग एन यांचीच सत्ता होती आणि आता तर पाकिस्तानात त्यांचेच सरकार आले आहे.

अमेरिकेने हाफिज सईदवर १० दशलक्ष डॉलर्सचे बक्षीस जाहीर केले आहे. मात्र त्याच्यावर अथवा त्याच्या संस्थांवर पाकिस्तानात बंदी घातली गेलेली नाही. तो आजही लाहोरमध्ये उघडपणे वावरत आहे असेही समजते.