पावसाने पुणे परिसरातील ४० गावांचा संपर्क तुटला

पुणे- गेल्या तीन दिवसपासून पुणे परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली. विशेषता मावळ परिसरात जोरदार पाऊस झाला . या पावसाने पूर आल्याने अनेक पूल पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे सुमारे ४० गावांचा संपर्क खंडित झाला आहे. दरम्यान, भुशी धरणाच्या मागील बाजूस असलेल्या धबधब्यात येरवडा येथील एक युवक वाहून गेला. या पावसाने धरणातील पाणी साठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे.

पुण्याजवळच्या खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रांत गेल्या चोवीस तासांत दमदार पाऊस झाल्याने दीड टीएमसी पाणी एकाच दिवशी जमा झाले आहे. लोणावळ्याचा भुशी डॅम या वर्षी पहिल्याच पावसात भरून वाहू लागला आहे. दरम्यान, भुशी धरणाच्या मागील बाजूस असलेल्या धबधब्यात येरवडा येथील एक युवक वाहून गेला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या मुसळधार पावसाने पवना धरणाच्या पाणीसाठ्यात दोन दिवस सुरू असलेल्या संततधारेमुळे दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. धरण ३४ टक्के भरले असल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली. पावसाळा सुरू झाल्यापासून गेल्या दहा दिवसांत मावळात ६३८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यापैकी २५० मिलिमीटर पाऊस रविवारी दिवसभरात पडला. लोणावळ्यात ३१० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पवना, इंद्रायणी आणि मुळा नद्या दुथडी भरून वाहात आहेत.