महाराष्ट्रासह सार्या देशातच पावसाने हजेरी लावल्याने सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे. भारताची अर्थव्यवस्था पावसावर अवलंबून असते. पाऊस समाधान कारक पडला की बाजारातले औदासिन्य कमी व्हायला लागते. आताही मराठवाड्याच्या काही भागाचा अपवाद वगळता सार्या महाराष्ट्रात आणि पूर्व भारतातल्या काही जिल्ह्यांचा अपवाद वगळता सार्या भारतात पावसाने बहार करून टाकली आहे. उत्तर भारतातल्या काही राज्यांत विशेषत: उत्तरांचलात पावसाने थैमान घातले आहे. तिथे अनेक ठिकाणी ढगङ्गुटीचे प्रकार घडत आहेत. नद्यांना पूर आले असून त्या भागात गेलेले अनेक पर्यटक अडकून पडले आहेत. नदीच्या पुरात वाहून जाण्याने अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजाप्रमाणे नैऋत्य मोसमी वार्याचा पाऊस लवकरच सुरू झाला आहे. महाराष्ट्रात १० जूनच्या आत पावसाचे हजेरी लावली. मुंबई शहराला सहस्त्रधारांनी चिंब करून टाकले. पुण्यात जूनमध्येच संततधार लागली. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्याचे म्हटले जाते पण या शहरात पावसाच्या पाण्याचा निचरा करण्याची सोय ङ्गारच असमाधानकारक आहे त्यामुळे हे शहर थोड्याच पावसात तुंबायला लागले आहे.
मुंबईच्या मोठ्या भागात विशेषत: पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्गावर सुद्धा पाणी साचले. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थे बरोबरच खाजगी वाहनांनी प्रवास करणार्या मुंबईकरांचे सारे वेळापत्रक कोलमडून पडले. मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या ४०० ङ्गेर्या रद्द करण्यात आल्या. अनेकस्थानकांच्या परिसरात प्रवाशांची गर्दी उसळली. अशा रितीने मुंबईकरांनी पावसाच्या पहिल्याच महिन्यात असे हाल सहन केले. मुंबईमध्ये जुलै-ऑगस्ट या महिन्यात जास्त पाऊस पडतो. २००६ साली मुंबईत विक्रमी पाऊस झाला होता. त्यावेळी अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी पडलेला पाऊस शतकातला विक्रमी पाऊस होता. कमीत कमी वेळेत एवढा प्रचंड पाऊस पडण्याचे ते नवल होते. त्यामुळे घराघरात पाणी शिरले आणि सारी मुंबई ठप्प झाली. पण यंदा मात्र असा विक्रमी पाऊस न पडता सुद्धा मुंबई ठप्प होण्याचा विक्रमी प्रकार घडणार आहे. मुंबईत २००६ साली अचानक पाऊस पडण्याचा जो प्रकार घडला तसा महाराष्ट्रात यंदा विदर्भात घडला आहे आणि तिथे एका गावात पूर्ण पावसाळ्याच्या पावसातला निम्मा म्हणजे १२ इंच पाऊस एका तासात पडून गेला. मराठवाड्यातले लोक मात्र पावसाची वाट पहात आहेत.
साधारण १० जूनला महाराष्ट्रात येणारा पाऊस नंतर हळू हळू पुढे सरकतो आणि साधारणत: जुलै महिन्यापर्यंत तो देशव्यापी होतो. पावसाळी वार्यांचा हिंद महासागरातून भारतात प्रवेश करताना जेवढा प्रभाव आणि जोर केरळमध्ये किंवा दक्षिण भारताच्या राज्यात असतो तेवढा तो उत्तर भारताकडे सरकेपर्यंत रहात नाही आणि पूर्ण देशाला पावसाने व्यापण्यास बराच कालावधी जावा लागतो. १९६१ साली २१ जून रोजी पाऊस देशव्यापी झाला होता आणि तो लवकरात लवकर देशव्यापी होण्याचा विक्रम मानला जातो. पाऊस देशव्यापी होणे म्हणजे महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान यासह पूर्ण दक्षिण भारत जलमय होणे. यावर्षी हा विक्रम १६ जूनलाच मोडला गेला आहे. २००६ साली २४ जुलैपर्यंत हे घडले नव्हते. यंदा मात्र भारतातील सर्व राज्यांमध्ये कालपर्यंत आणि सरासरीच्या एक महिना आधी पाऊस पडून पूर्ण भारत जलधारांनी चिंब झाला आहे. यावर्षी अशी परिस्थिती निर्माण होण्याचे कारण म्हणजे कमी दाबाचे काही विशिष्ट पट्टे. सध्या कमी दाबाचे क्षेत्र मध्य प्रदेश आणि त्याला लगत असलेल्या पूर्व राजस्थानावर केंद्रित झाले आहे आणि त्याचा प्रभाव पडून राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये जोरदार पर्जन्यवृष्टी सुरू आहे.
यावेळी निर्माण झालेली ही परिस्थिती खरोखरच अभूतपूर्व आहे ही अशासाठी की, अरबी समुद्रात दक्षिण गुजरात ते केरळ किनारपट्टी या क्षेत्रावर प्रभाव पडणारा कमी दाबाचा पट्टा याचवेळी निर्माण झाला आहे. त्यामुळे गुजरात आणि केरळमध्ये पाऊस पडत आहे. केरळमध्ये या पावसाचा जोर विशेष आहे. या दोन पट्ट्यांच्या मध्ये येणारा महाराष्ट्राचा किनारी प्रदेश म्हणजेच कोकण गेल्या आठवड्यात मुसळधार पावसाने चिंब झाला. उत्तर बंगालच्या उपसागरापर्यंत आणखी एक कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे आणि त्याचा परिणाम म्हणून ईशान्य भारतामध्ये सुद्धा पर्जन्यवृष्टी सुरू आहे. १ जून ते १४ जून या कालावधीत उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार जूनमध्ये नेहमी पडणार्या पावसाची टक्केवारी बर्यापैकी भरली गेलेली आहे. जून महिन्याच्या सरासरीच्या ३७ टक्के पाऊस पडला आहे. ईशान्य आणि पूर्व भारत म्हणजे बिहार, ओरिसा, बंगालचा दक्षिण भाग हे भाग पावसाच्या बाबतीत थोडे मागे पडले आहेत. या भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे. परंतु राजस्थान, हरियाना, मध्य प्रदेश या वायव्य भागात जूनच्या सरासरीच्या ६४ टक्के, मध्य भारतात १३४ टक्के तर दक्षिण भारतात ६१ टक्के पाऊस झाला आहे. यावर्षी सर्वत्रच अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.
