पुणे, दि. 17 (प्रतिनिधी) – मुख्यमंत्र्यांनी आज निवडणुकीच्या प्रचाराचे पत्ते खोलण्यास आरंभ केला. ‘येणार्या लोकसभा नजरेसमोर ठेऊन भारतीय जनता पक्षाकडून फॅसीस्ट विचारसरणीला चालना देण्याचा प्रयत्न होत आहे. हा फॅसिस्टवाद रोखण्याचे आव्हान धर्मनिरपेक्षवादी पक्षांपुढे असून तो फॅसिस्टवाद रोखण्यालची शक्ती समाजवादी विचारणीमध्ये आहे’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी केले.
भाजप कडून फॅसीस्ट विचारंना चालना – मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण
एस.एम. जोशी सोशलिस्ट फाऊंडेशन आणि नानासाहेब गोरे अकदमीच्या कार्यकर्ता प्रशिक्षण इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री चव्हाण यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फाऊंडेशनचे अध्यक्ष जी.जी. पारिख होते. ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य, आमदार आप्पासाहेब सा.रे. पाटील, माजी आमदार उल्हास पवार, म्हाडाचे अध्यक्ष अंकुश काकडे, विश्वस्त सचिव सुभाष वारे, विश्वस्त अभय जोशी आदी यावेळी उपस्थित होते.
भाजपकडून गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून पुढे आणले जात असल्याच्या पार्श्वभूमीवर मोदी यांचा नामोल्लेख टाळत मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, येणारी लोकसभा निवडणूक निर्णायकी ठरणार आहे, भाजपकडून ज्या प्द्धतीने फॅसीस्ट विचारांना प्रोत्साहन देण्यात येत आहे त्याला रोखण्याचे काम फक्त काँग्रेसच नाही तर सर्वच धर्मनिरपेक्षवादी राजकीय पक्षांना करावे लागणार आहे. एस.एम. जोशी व नानासाहेब गोरे यासारख्या समाजवादी नेत्यांच्या विचाराद्वारे हे शक्य आहे.
स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यत्तोर कालखंडात कार्यकर्ते निर्माण करणार्या एस.एम. व नानासाहेबांविषयी महाराष्ट्राला आदर असल्याचे सांगत मुख्यमंत्री म्हणाले, काँग्रेसचा विचार समाजवादी नसला तरी समाजवादी विचारधारेचे उदिष्ट समाजातील शेवटच्या माणसाची प्रगती हे असते व काँग्रेसही त्याच साठी प्रयत्नशील राहिला आहे. कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्याची गरज असते कारण चांगला कार्यकर्ता आपल्या संघटनेचे विचार, कार्य लोकांपर्यंत पोहचवत असतो, या प्रशिक्षण केंद्रामधून चांगले कार्यकर्ते घडतील अशी अपेक्षा चव्हाण यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुभाष वारे यांनी केले.
पावसामुळे चिंता मिटली
राज्यात निर्माण झालेल्या भीषण दुष्काळाचा सामना करण्यासाठी सुमारे साडे पाच हजार कोटी रूपयांचा खर्च झाला आहे. राज्यात पुन्हा दुष्काळी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी दीर्घकालीन उपाययोजनांची आवश्यकता असून त्यासाठी साठ हजार कोटी रूपयांची आर्थिक तरतूद करण्यात येणार आहे तो प्रकल्प तीन वर्षात पूर्ण होणार आहे. राज्यात सर्वत्र मान्सूनचे जोरदार आगमन झाल्याने सध्या मोठठी चिंता मिटल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
फोटो ओळ – नवी पेठ, एस.एम. जोशी सोशलिस्ट माऊंडेशन व नानासाहेब गोरे अकादमीच्या वतीने उभारण्यात आलेल्या कार्यकर्ता प्रशिक्षण केंद्र इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते झाले. यावेळी (डावीकडुन) आमदार आप्पासाहेब सा.रे. पाटील, उल्हास पवार, भाई वैद्य, जी.जी. पारिख, अंकुश काकडे.
