
मुंबई: शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी मुंबईतील ऑक्सिजन तुटवड्याची समस्या सोडविण्यासाठी केलेल्या आवाहनाला ‘भाभा अणुशक्ती संशोधन केंद्रा’तील (बीएआरसी) शास्त्रज्ञांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. आता मुंबईला ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी बीएआरसीने पाऊल उचलले आहे. या प्लांटमधून पहिल्या टप्प्यात प्रत्येकी 50 लिटरचे सुमारे 10 सिलेंडर उपलब्ध होणार असल्याची माहिती खासदार राहुल शेवाळे यांनी दिली.
शिवसेनेच्या खासदारमुळे मुंबईला मोकळा श्वास घेण्यास मदत करणार बीएआरसी
राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता वाढत असताना महाराष्ट्राला ऑक्सिजन तुटवड्याची समस्या भेडसावत आहे. खासदार राहुल शेवाळे यांनी अशा परिस्थितीत, बीएआरसीच्या अधिकारी-शास्त्रज्ञांसोबत संपर्क साधून यावर तोडगा काढण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर बीएआरसीने विशेष प्लांट तयार करून पाण्यापासून ऑक्सिजनची निर्मिती करायला सुरुवात केली. या प्लांटमधून, प्रत्येकी 50 लिटर ऑक्सिजनचे सुमारे 10 सिलेंडर उपलब्ध केले जाणार आहेत.
दक्षिण-मध्य मुंबईतील सरकारी रुग्णालये आणि कोविड केंद्रांना हे सिलेंडर पुरविण्यात येणार असून मागणीप्रमाणे पुरवठा वाढविण्याची तयारीही बीएआरसीने दाखवली आहे. बीएआरसीच्या प्लांटसोबत खासदार राहुल शेवाळे यांच्या पुढाकाराने राष्ट्रीय केमिकल्स फर्टिलाझर्स (आरसीएफ) ने गोवंडीच्या शताब्दी रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट उभारला आहे. तसेच बीपीसीएलच्या वतीनेही असाच प्लांट लवकरच कार्यान्वित होणार आहे.
लवकरच दक्षिण-मध्य मुंबई ऑक्सिजन तुटवड्याच्या समस्येतून या सर्वाचा एकत्रित परिणाम म्हणून मुक्त होईल, असा विश्वास खासदार शेवाळे यांनी व्यक्त केला आहे. ऑक्सिजन तुटवड्याच्या समस्येबाबत 13 एप्रिल रोजी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिंता व्यक्त केली होती. त्यानंतर माझ्या वतीने करण्यात आलेल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देऊन ऑक्सिजन टंचाई दूर करण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल बीएआरसी, आरसीएफ, बीपीसीएल यांचे मी आभार मानतो. असे खासदार राहुल शेवाळे यांनी म्हटले आहे.
बीएआरसीच्या शास्त्रज्ञांनी ऑक्सिजन प्लांट कार्यान्वित करण्यासोबतच नागरिकांच्या वापरासाठी अद्ययावत असे मास्क तयार केले आहेत. एन 95 पेक्षाही जास्त सुरक्षित हे मास्क असल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. तसेच रिमोट बॉडी टेम्परेचर मशीनही बीएआरसीने विकसित केले आहे.
