पुण्यात भिंत पडल्याने चौघांचा मृत्यू

पुणे – शहर व परिसरात रविवारी जोरदार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे दांडेकर पुलाजवळील सोसायटीची संरक्षक भिंत कोसल्याने चौघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये तीन महिला व एका पुरुषाचा समावेश आहे. रविवारी रात्री आठच्या सुमारास ही दुर्घटना घडली. यामध्ये छोटे ट्रक-टेम्पो याचे नुकसान झाले आहे. नगर रोडवरील वडगाव शिंदे येथे दोन मुले नदीच्या मध्ये असलेल्या खडकावर अडकले होते त्यांना रात्री उशिरा पाण्याबाहेर काढण्यात आले तर आळंदीत पुरामुळे झाडावर अडकून पडलेल्या दोघांना बाहेर काढण्यात आले.

दांडेकर पुलाजवळील रस्त्याच्या उजव्या बाजूला सुवर्णानंद पार्क ही आठ मजली सोसायटी आहे. त्याच्या बेसमेंट व पहिल्या मजल्यासाठी ही संरक्षक भिंत बांधण्यात आली होती. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने सुमारे ५० फूट लांब भिंत खचली आणि २० फूट खाली कोसळली. या ठिकाणी ट्रान्स्पोर्टसाठीचे छोटे ट्रक-टेम्पो उभे करून ठेवण्यात येतात. भिंत कोसळल्याने त्यांचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. संरक्षक भिंत कोसल्याने चौघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये तीन महिला व एका पुरुषाचा समावेश आहे. अग्निशामक दलाचे जवान , महापालिकेच्या जेसीबींनी राडारोडा उचलण्याचे काम सुरू केलेआहे.

दरम्यान, नगर रोडवरील वडगाव शिंदे येथे नदीचे पाणी अचानक वाढल्याने दोन मुले नदीच्या मध्ये असलेल्या खडकावर अडकल्याची घटना घडली. रात्री उशिरा या मुलांना बाहेर काढण्यात आले. आळंदीजवळील गोलेगावात दोन जण भर पावसात झाडावर अडकून पडले. एनडीआरफच्या जवानांनी रात्री उशिरा त्यांना वाचविण्यासाठी धाव घेतली. दोन दिवसाच्या या मुसळधार पावसाने शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.