इस्लामाबाद, दि.१७ – पाकिस्तानच्या नैऋत्येस असलेल्या क्वेटा शहरातील सरदार बहादूर खान महिला विद्यापीठात शनिवारी एका बसमध्ये बॉम्ब स्फोट झाल्याने ११ विद्यार्थीनींचा जागीच मृ्त्यू झाला असून इतर २२ गंभीर जखमी झाले आहेत. या बसमध्ये विद्यार्थीनी तसेच शिक्षक घरी जाण्यासाठी थांबले होते.
पाकिस्तानात महिला विद्यापीठात बॉम्बस्फोट
पोलिस अधिकार्यांरनी दिलेल्या माहितीनूसार, स्फोटात मृत्यूमुखी पडलेल्या सर्व ११ विद्यार्थीनी ह्या विद्यापीठाच्याच होत्या. या स्फोटात जखमी झालेल्या 22 जणांमध्येही जास्त करुन विद्यार्थीनींचाच समावेश आहे. स्फोटानंतर लगेचच जखमींना जवळील रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यामध्ये तीन जणांची स्थिती अत्यंत गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. या स्फोटानंतर बसमध्ये आग लागल्याने अनेक मुली भाजल्या आहेत. स्फोटाची तीव्रता इतकी जास्त होती की, त्यांत बसचे छत उडून गेले आहे.
दुर्घटनेनंतर तात्काळ सुरक्षा रक्षकांनी जागेची नाकाबंदी केली असून या घटनेबाबत तपास सुरु केला आहे. स्फोटानंतर आसपासच्या भागात धावपळ सुरु झाली आणि विद्यापीठाला तात्काळ खाली करण्यात आले. कोणत्याही आतंकवादी संघटनेने या स्फोटाची जिम्मेदारी घेतली नाही. या स्फोटाच्या काही तास आगोदर क्वेटापासून १२० किलोमिटर दूर असलेल्या जिन्ना यांच्या १२१ वर्ष जुन्या घरावर सकाळी हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात दोन पोलिसांचा मृत्यू झाला होता.
