पाकिस्तानात जिनांचे घर उद्ध्वस्त

भारत स्वतंत्र होताना त्याचे विभाजन करून पाकिस्तानची निर्मिती करणारे बॅ. महंमद अली जिना यांचे पाकिस्तानातले घर तिथल्या अतिरेक्यांनी जमिनदोस्त केले आहे. या घरावर बॉम्बहल्ला करून ते उद्ध्वस्त करण्यात आले. या घरातील लाकडी फर्निचर आणि मौल्यवान वस्तू जळून खाक झाल्या आहेत. क्वेट्याजवळील झियारत या गावी हे घर होते. जिना यांना पाकिस्तानात कायदे-आझम म्हटले जाते आणि त्यांच्या घराचे नाव सुद्धा कायदे आझम रेसिडन्सी असे होते. ते उद्ध्वस्त करण्यासाठी दहशतवाद्यांनी बॉम्बचा वापर केला. त्यांनी किती बॉम्ब वापरले याचा शोध अजून लागायचा आहे. परंतु या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळाचा ताबा घेऊन तपासणी मोहीम हाती घेतली तेव्हा त्या ठिकाणी ६ शक्तीशाली बॉम्ब आणि बरीच स्फोटके सापडली. कायदे-आझम बॅ. जिना हे या घरात रहात होते. १८९२ साली बांधलेले हे घर जिनांच्या वास्तव्यामुळे राष्ट्रीय स्मारक म्हणून जतन करण्यात आले होते. ते आता उद्ध्वस्त झाले आहे.

वास्तविक पाहता बॅ. जिना यांनी पाकिस्तान निर्मितीसाठी बरेच परिश्रम घेतले होते. त्यामुळे कट्टर जातीयवादी मुस्लिमांमध्ये त्यांच्याविषयी आदर व्यक्त केला जातो. वरकरणी असे समजले जात असले तरी अगदीच पुराणमतवादी मुस्लिमांमध्ये बॅ. जिना यांच्याविषयी नाराजीची भावना आहे. जिना यांनी पाकिस्तानची निर्मिती केली असली तरी ते कट्टर मुस्लीम नव्हते. मुस्लीम समाजात डुकराचे मांस अपवित्र समजले जाते. पण बॅ. जिना ते खात असत. ते मद्यपानही करीत. त्यांचे राहणीमान पूर्णपणे ब्रिटिशांसारखे होते. ते नमाज पढत नव्हते आणि त्यांची पत्नी मुस्लीम नव्हती. त्यांनी पाकिस्तान निर्मिती केली असली तरी सनातनी मुस्लीम समाजात त्यांच्याविषयी आदर बाळगला जात नाही.

बॅ. जिना यांच्याविषयी आणखी एका कारणाने नाराजी आहे. त्यांनी भारताचे विभाजन घडवून एक छोटा तुकडा पाकिस्तान म्हणून मिळवला आणि ते इस्लामी राष्ट्र झाले. परंतु अनेक सनातनी मुस्लिमांना पाकिस्तान असे नको होते. त्यांना अखंड भारताचेच रूपांतर एका मुस्लीम राष्ट्रात करायचे होते आणि हिंदुस्थानलाच पाकिस्तान करायचे होते. परंतु जिना यांना त्यात यश आले नाही आणि भारताचा एक तुकडा पाकिस्तान म्हणून मिळाला. त्यामुळे पाकिस्तानची निर्मिती झाली त्यावेळी सुद्धा सर्वसाधारणपणे एक मुस्लीम राष्ट्र निर्माण झाल्याचा आनंद असला तरी जिनांची डिप्लोमसी चुकल्याची भावना अनेक मुस्लिमांच्या मनात होती.