एनडीएतून जेडीयू बाहेर पडण्याची शक्यता दुरावली?

नवी दिल्ली दि.१५ – बिहारचे मुख्यमंत्री नितिशकुमार यादव यांनी उद्या म्हणजे रविवारी एनडीएतून बाहेर पडायचे वा कसे याचा निर्णय घेण्यासाठी बोलावलेली आमदार खासदारांची बैठक होण्याची शक्यता नसल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. नितिशकुमारांची युती तोडू नये यासाठी भाजपने समजूत काढण्याचा केलेला प्रयत्न अपयशी ठरला असला तरी जेडीयूचे अध्यक्ष व समन्वयक शरद यादव यांनी मात्र युती तोडण्याबाबत सौम्य भूमिका घेतली आहे असे समजते. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथसिंग यांनी शरद यादव यांच्याशी केलेल्या चर्चेनंतर यादव यांचे मत थोडे सौम्य बनले आहे असे सागितले जात आहे.

वास्तविक जेडीयू आमदार खासदारांची बैठक शनिवारीच होणार होती. मात्र शरद यादव हे शनिवारी म्हणजे आज सायंकाळी पाटण्यात पोहोचणार आहेत आणि सर्वप्रथम नितिशकुमार आणि यादव यांची गुप्त बैठक होणार आहे असेही समजते. यामुळेच आमदार खासदारांची बैठक रविवारी घेण्याचा निर्णय घेतला गेला होता मात्र आता ही बैठकीही होईल का नाही या बाबत संभ्रम निर्माण झाला असल्याचे समजते.

भाजपने गोवा चिंतन बैठकीत २०१४ लोकसभा निवडणुकीसाठी नरेंद्र मोदी यांची पक्षाचे प्रचारप्रमुख म्हणून घोषणा केल्यामुळे जनता दल युनायटेड मध्ये नाराजी होती. मात्र गुजराथ २००२ च्या दंगलीत मोदींनी मुस्लीमांचे संरक्षण करण्यासाठी हालचाल केली नाही इतकाच त्यांच्याविरूद्ध जनता दलाचा आक्षेप आहे. त्यातच एनडीए गेली १३ वर्षे एकत्र असल्याने आणि आगामी लोकसभा निवडणुकांत त्यांना बहुमत मिळण्याची शक्यता असल्याने ही युती तोडू नये असा दबाव जनता दलावर येत असल्याचेही समजते.