बुजगावणे

नितीशकुमार यांनी भारतीय जनता पार्टीला भिववण्यासाठी तिसरी आघाडी नावाचा बागुलबोवा उभा केला आहे पण तिसरी आघाडी नावाची काही शक्ती या देशात नाही. भाजपा आणि कॉंग्रेस यांना वगळून जे काही पक्ष आहेत त्यांना ढोबळ मानाने तिसरी आघाडी म्हणून ओळखले जाते पण या आघाडीतले पक्ष अनेक ठिकाणी एकमेकांच्या विरोधात असतात. भाजपा आणि कॉंग्रेस या दोन्ही पक्षांपासून काही अंतर राखून असलेले पक्ष असे त्यांना म्हटले जात असले तरीही त्यातल्या काहींचा बोलविता धनी भाजपा आहे तर काहींचा बोलविता धनी कॉंग्रेस आहे. त्यामुळे त्यांची पावले कोणत्या क्षणी यातल्या कोणत्या पक्षाकडे वळतील याचा काही भरवसा नाही. शेवटी तो शेवटी बागुलबोवाच आहे हे लक्षात घेतले पाहिजे कारण तो प्रत्यक्षात अस्तित्वात नाही. भाजपाचा नेता कोण असावा यावरून नितीशकुमार आणि भाजपाचे मतभेद आहेत. नितीशकुमार यांना भाजपा पक्ष सोबत हवा आहे पण त्यांना मोदींचा भाजपा नको आहे तर अडवाणी यांचा भाजपा हवा आहे. भाजपाला मात्र अडवाणी नको आहेत. यांच्यापेक्षा अधिक मते खेचून आणणारे मोदी हवे आहेत. या भांडणात भाजपावर दबाव टाकण्यासाठी नितीशकुमार यांनी हे तिसर्‍या आघाडीचे बुजगावणे उभे केले आहे.

नितीशकुमार यांना भाजपाचे मोदी असेपर्यंत बिहारातले मुस्लिम आपल्या बाजूला येणार नाहीत अशी भीती वाटते म्हणून मोदी हा ग्रह दूर झाल्याशिवाय आपल्या मार्गातल्या दुष्ट ग्रहांची शांती होणार नाही ही खुणगाठ त्यांनी मनाशी बांधली आहे आणि ते मोदींच्या मागे लागले. भाजपाला कशाचे तरी भेव दाखवले पाहिजे म्हणून नितीशकुमार यांनी तिसरी आघाडी नावाच्या बुजगावण्याकडे बोट दाखवले आणि आपण या आघाडीत सामील होऊ असे दटावले. या चालीमुळे भाजपात मोदींच्या ऐवजी अडवाणी यांचा भाव थोडा वधारला पण हे तिसर्‍या आघाडीच्या बुजगावण्यात थोडा जीव आला. नवीन पटनाईक यांनी तिसरी आघाडी संघटित करण्याचे सूतोवाच केले आणि नितीशकुमार यांनी ममता बॅनर्जी यांची भेट घेतली. एवढ्या गोष्टीवरून तिसर्‍या आघाडीच्या निर्मितीच्या शिळ्या कढीला ऊत आला. तसा तो आला असला तरीही तिसरी आघाडी ही काही या देशाच्या राजकारणातली वस्तुस्थिती नाही. कारण आजवर तिची केवळ चर्चाच झाली आहे. तिच्यात येणे अपेक्षित असलेले नेते हे एक होत नाहीत.

त्यांची तोंडे निरनिराळ्या दिशांना असतात. त्यांच्या त्यांच्या राज्यातले स्थानिक राजकारण कधी सारखे नसते. त्या प्रत्येक पक्षाचा जनाधार वेगवेगळा आहे. आपल्या देशातल्या राजकीय आघाड्या केवळ बहुमताच्या बेरजेसाठी होतात हे खरे पण तिसर्‍या आघाडीतल्या घटक पक्षांत बेरजेसाठीही एकमत होण्याची शक्यता नाही. तामिळनाडू, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, पंजाब, आंध्र प्रदेश या राज्यात दोन दोन प्रादेशिक पक्ष आहेत आणि तिथे ते एकमेकांच्या विरोधात उभे आहेत. तेव्हा केन्द्रात तिसरी आघाडी झालीच तर हे पक्ष तिथे एकमेकांच्या विरोधातच राजकीय भूमिका घेतात. अद्रमुक आणि द्रमुक या दोन पक्षांनी हे मागे दाखवून दिले आहे. आंध्रात तर आता तेरास, तेलुगु देसम आणि जगन मोहन यांचा पक्ष असे तीन प्रादेशिक पक्ष आहेत. महाराष्ट्रात राष्ट्रवादी, शिवसेना आणि मनसे असे तीन पक्ष आहेत. अशा संकीर्ण पक्षांचे एकीकरण नेमके कसे करणार ? त्यांची त्यांची राज्यातली गणिते त्यांना एकत्र आणूच शकणार नाहीत. आजवर कोणत्याही निवडणुकीच्या आधी तिसर्‍या आघाडीचे पक्ष हातात हात घालून लढलेले नाहीत. ते भाजपा आणि कॉंग्रेस पासून वेगळी आघाडी तयार करण्याच्या वल्गना करीत असले तरीही त्यांची अन्य पक्षाच्या बालेकिल्ल्यात घुसखोरी करण्याची कोशीश जारी असते. बहुजन समाज पार्टीला तिसर्‍या आघाडीचा घटक पक्ष मानून कोणी जवळ करू शकत नाही कारण आपला पक्ष तिसर्‍या आघाडीच्या किरकोळ घटक पक्षासारखा लहान पक्ष आहे हे बसपा नेत्या मायावती यांना मान्य नाही. त्यांचा सर्व राज्यांत वजन वाढवण्याचा प्रयत्न असतो. समाजवादी पार्टीही काही किरकोळ नाही. त्यांनी बिहारात आपले वेगळे स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांची महाराष्ट्रात कोणाशी आघाडी होईल आणि भाजपा सारख्या जातीयवादी पक्षाला पराभूत करण्यासाठी ते कोणाच्या हातात हात देतील ? भारतातले भाजपा आणि कॉंग्रेस वगळता अन्य पक्ष एकत्र करून कोणीतरी एक आघाडी उभीच करावी. तसे झाल्यास निवडणुकीत बर्‍याच मनोरंजक घटना घडतील. कल्पनेच्या पातळीवर आणि शक्यतेच्याही पातळीवर हे सारे छोटे छोटे पक्ष एकत्र येणे कधीच शक्य नाही. याही स्थितीत त्यांनी सत्ता हस्तगत केली आहे पण ती नाइलाज म्हणून त्यांना मिळाली आहे. त्यांचा एकही पंतप्रधान एक वर्षापेक्षा अधिक काळ पदावर राहिलेला नाही. चरणसिंग हे तर संसदेला सामोरेही गेले नाहीत. व्ही पी सिंग अकरा महिने तर चंद्रशेखर चार महिने टिकले. असे हे तिसरी आघाडी म्हणजे अळवावरचे पाणी आहे. ती कायम कागदावर असते. वास्तवात कधीच उतरत नाही.