मुंबई महापालिकेचा लसींच्या तुटवड्यामुळे 45 वर्षांवरील सर्वांचे लसीकरण बंद करण्याचा निर्णय


मुंबई : कोरोना लसीकरण मोहिमेतंर्गत पुरेशा लसींची उपलब्धता नसल्यामुळे मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शासकीय, महानगरपालिका आणि खासगी लसीकरण केंद्रांवर 45 वर्ष आणि त्यावरील वयोगटातील नागरिकांचे आज लसीकरण होणार नाही. तर पालिकेने ठरवून दिलेल्या 5 केंद्रांवर 18 ते 45 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू राहणार असल्याची माहिती महानगरपालिका प्रशासनाने दिली आहे.

तसेच कोविन अॅपमध्ये ज्यांची नोंदणी झालेली आहे आणि ज्यांना निर्धारित लसीकरण केंद्र आणि वेळ दिलेला आहे, त्यांनाच लसीकरण केंद्रावर लस मिळणार आहे. सध्या सर्व वयोगटातील नागरिक लसीकरण केंद्रावर मोठ्या स्वरूपात गर्दी करत आहेत. कोरोनाच्या वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांनी विनाकारण घराबाहेर आणि लसीकरण केंद्रावर येऊन गर्दी न करण्याचे आवाहन पालिकेकडून करण्यात येत आहे.

लस उपलब्ध करण्यासाठी पालिका प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात असून लसीचा साठा प्राप्त होताच नागरिकांना कळविण्यात येणार आहे. तोपर्यंत नागरिकांनी लसीकरण केंद्रावर येऊन गर्दी करू नये, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

मुंबईत, बृहन्मुंबई महानगरपालिका, शासन यांच्यातर्फे कोरोना लसीकरण मोहिमेसाठी 63 केंद्रे तसेच खासगी रुग्णालयात 73 अशी एकूण 136 कोरोना लसीकरण केंद्रे सुरु करण्यात आलेली आहे. सद्यस्थितीत कोरोना प्रतिबंधक लसीचा पुरेसा साठा उपलब्ध नसल्यामुळे महानगरपालिका, शासकीय आणि खासगी कोरोना लसीकरण केंद्रात आज 45 वर्षे आणि त्यावरील वयाच्या नागरिकांचे लसीकरण होऊ शकणार नाही.

दरम्यान, महापालिकेने जाहीर केलेल्या 5 केंद्रावर 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरु राहणार आहे. आज सकाळी 9 ते 9 या नियमित वेळेत लसीकरण सुरू राहणार असून या 5 केंद्रावर प्रत्येकी 500 नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. हे लसीकरण केवळ ‘कोविन ॲप’ मध्ये नोंदणी केलेल्या व्यक्तींसाठी असणार आहे.

मुंबईतील फक्त ‘या’ 5 केंद्रावर होणार लसीकरण

  • बा. य. ल.‌ नायर सर्वोपचार रुग्णालय (मुंबई सेंट्रल परिसर)
  • सेठ वाडीलाल छत्रभुज गांधी व मोनजी अमिदास व्होरा सर्वोपचार रुग्णालय, राजावाडी (घाटकोपर परिसर)
  • डॉ. रुस्तम नरसी कूपर सर्वोपचार रुग्णालय (जुहू विलेपार्ले पश्चिम परिसर)
  • सेव्हन हिल्स रुग्णालय (अंधेरी परिसर)
  • वांद्रे कुर्ला संकुल येथील जम्बो कोविड सेंटर