नवी दिल्ली दि.१३ – जनता दल युनायटेड आणि एनडीए यांच्यात कोणत्याही क्षणी होऊ शकणारा घटस्फोट टाळण्यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवानी पुढे सरसावले असल्याचे वृत्त आहे. सद्यस्थितीत त्यांनी ही युती तोडली जाऊ नये म्हणून पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांच्याशी संपर्क साधून मध्यस्ती करण्याची विनंती केली आहे. आणि स्वतःही जनता दल नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नितिशकुमार यांच्याशीही संपर्क साधला आहे असे समजते.
गोव्यातील भाजप राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देऊन आडवानी गैरहजर राहिले होते. इतकेच नव्हे तर भाजप निवडणूक प्रचार प्रमुख पदी नरेंद्र मोदी याच्या नावाची घोषणा होताच नाराज होऊन त्यांनी सर्व पदांचा राजीनामाही दिला होता. नंतर समजूत काढल्यानंतर तो मागेही घेतला. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर एनडीए तुटू नये म्हणून पुन्हा आडवानी कार्यरत झाल्याचे दिसून येत आहे.
मात्र नितिशकुमार कोणत्याही प्रकारचा समझोता करण्यास उत्सुक नाहीत. १५ जूनला जनता दल नेते आमदारांच्या बैठकीत युती संबंधीचा निर्णय घेतला जाणार आहे आणि ही युती तोडण्याचाच निर्णय होईल असे जाणकारांचे मत आहे. भाजपनेही युती तुटेल असे गृहित धरून तयारी चालविली आहे. मात्र बिहार मध्ये असलेली भाजप जनता दल युती तुटू नये यासाठी मात्र प्रयत्न केले जात असल्याचे समजते. बिहारमध्ये या युतीला जनमताचा कौल आहे आणि म्हणून ती तोडू नये असा भाजपचा आग्रह आहे.
दरम्यान सर्व पदांचे राजीनामे दिल्यानंतर आडवानींनी राजीनामे मागे घेण्यासाठी घातलेल्या अटींबाबत आता कांही माहिती बाहेर येत आहे. राजीनामा पत्रात कोणतीही कारणे दिली गेली नसली तरी आडवानी यांनी तीन अटी राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या होत्या असे समजते. पैकी पहिली अट म्हणजे ज्येष्ठत्व आणि पक्षासाठी दिलेले योगदान पाहता पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून त्यांचे नांव जाहीर केले जावे आणि सत्ता मिळालीच तर निदान सहा महिने तरी पंतप्रधानपद त्यांना दिले जावे. दुसरी अट म्हणजे मोदींना प्रचार प्रमुख पदाऐवजी कन्व्हेअर म्हणून नेमले जावे आणि प्रचार प्रमुखपद नेमले गेले आहे तर मोदी यांनी आडवानी यांना थेट रिपोर्ट करावा आणि निर्णय घेताना अंतिम निर्णय आडवानी घेतील तोच मान्य व्हावा अशी तिसरी अट होती असे समजते.