शुक्ल युगाचा अंत

छत्तीसगड मध्ये जबरदस्त राजकीय प्रभाव असलेले कॉंग्रेसचे नेते विद्याचरण शुक्ल यांचे नक्षलवादी संघटनेने कॉंग्रेसच्या परिवर्तन रॅलीवर केलेल्या हल्ल्यात निधन झाले. ते या हल्ल्यात गंभीर जखमी झाले होते. काल गुडगाव येथील रुग्णालयात उपचार सुरू असतानाच ते मरण पावले. त्यांना अशा प्रकारचा मृत्यू यायला नको होता. त्यांचे वडील रविशंकर शुक्ल आणि ज्येष्ठ बंधू श्यामाचरण यांचा राजकारणावर प्रभाव होता. त्यांनी कॉंग्रेस पक्षाची इमाने इतबारे सेवा केली पण विद्याचरण शुक्ल यांची राजकीय कारकीर्द इतकी वादग्रस्त आणि संधीसाधूपणाची होती की त्यांना राजकारणातला खलनायकच म्हटले पाहिजे. ते इंदिरा गांधी यांच्या काळातले नेते होते. तसे ते नेहरुंच्या हयातीतच लोकसभेवर निवडून आले होते पण त्यावेळी ते फारच तरुण असल्यामुळे त्यांचा मंत्रिमंडळात समावेेश झाला नाही. राजकारणात इंदिरा गांधी यांचा उदय झाला तेव्हा मात्र शुक्ल यांनाही केन्द्रात मंत्री म्हणून संधी मिळत गेली. नंतर त्यांनी नरसिंहराव यांच्या सरकारमध्ये केवळ मंत्री म्हणूनच काम केले असे नाही तर त्यांनी खासदारांना कोट्यवधी रुपये देऊन सरकार वाचवण्याच्या कामात मोठा सहभाग नोंदवला.

या प्रकरणात सरकारची फार बदनामी झाली. खासदार खरेदी प्रकरण म्हणून ते इतके गाजले की, आता नरसिेंहराव यांच्या हातात बेड्या पडतात की काय अशी शक्यता वाटायला लागली. शुक्ल हे छत्तीसगढच्या महासमुंद लोकसभा मतदारसंघातून ९ वेळा निवडून आले होते आणि प्रत्येक वेळी आपण केंद्रीय मंत्रिमंडळात असले पाहिजे असा त्यांचा हट्ट होता. १९६६ साली इंदिरा गांधींच्या कृपेने ते मंत्रिमंडळात आले. त्यानंतर केंेद्रातल्या राजवटी बदलल्या परंतु त्या प्रत्येक राजवटीच्या मागे विद्याचरण शुक्ला नवीन टोपी परिधान करून उभे राहिले आणि मंत्रिपद प्राप्त करते झाले. त्यांनी व्ही.पी.सिंग, चंद्रशेखर यांच्याही मंत्रिमंडळात मंत्रिपदे उपभोगली. २००४ साली ते चक्क भाजपात आले होते. परंतु भाजपाची सत्ता गेली. मग त्यांनी भाजपाचाही त्याग करून कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. इंदिरा गांधी आणि नरसिंहराव या दोन पंतप्रधानांनी त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात महत्त्वाची खाती दिली होती. मात्र राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांच्या कारकीर्दीत ते उपेक्षित राहिले आणि त्यामुळे त्यांना पदे मिळाली नाहीत. शुक्ल यांचे घराणे हे राजकारणी घराणे होते. त्यांचे वडील रविशंकर शुक्ला मुख्यमंत्री होते आणि त्यांचे ज्येष्ठ बंधू शामाचरण शुक्ला हेही तीन वेळा मुख्यमंत्री झाले होते. ज्येष्ठ बंधुंप्रमाणे मुख्यमंत्री होेण्याची त्यांची इच्छा होती पण ती फलद्रुप झाली नाही.

एनडीए सरकारने २००० साली छत्तीसगढ हे नवे राज्य निर्माण केले. तिथे कॉंग्रेसचे बहुमत होते. शुक्ल यांना मुख्यमंत्री व्हायचे होते पण सोनिया गांधी यांनी अजित जोगी यांना मुख्यमंत्री केले. नंतर ते पदांना मुकतच गेले. १९६६ साली त्यांनी इंदिरा गांधींच्या मंत्रिमंडळात प्रवेश केला. १९७५ साली आणीबाणी लागू झाली तोपर्यंत ते इंदिरा गांधींचे विश्‍वासू सहकारी झाले होते. परिणामतः त्यांना आणीबाणीच्या काळात भलतेच महत्त्व आले. आणीबाणीमुळे हाती आलेल्या अधिकारांचा गैरवापर करून जनतेची पिळवणूक करणार्‍या काही ठराविक अत्याचारी मोजक्या नेत्यांमध्ये विद्याचरण शुक्ला यांचा समावेश झाला होता आणि आणीबाणीतली केंद्रातली राजवट इंदिरा गांधींचे स्वीय सहाय्यक ए.के.धवन, चिरंजीव संजय गांधी आणि तेव्हाचे हरियाणाचे मुख्यमंत्री बन्सीलाल तसेच विद्याचरण शुक्ला यांच्याच मुठीत होती. या काळात झालेल्या जनतेवरच्या अत्याचारात शामाचरण शुक्ला आघाडीवर होते. आणीबाणी उठल्यानंतर त्यांच्या अत्याचाराचा पंचनामा सुरू झाला तेव्हा शुक्ला यांचे एकेक कारनामे लोकांना कळले. त्या काळामध्ये आणीबाणीच्या विरोधातली एक घोषणा फार लोकप्रिय झाली होती. आणीबाणीचे तीन दलाल, संजय शुक्ला बन्सीलाल. यावरून आणीबाणीत धुडगूस घालण्याच्या बाबतीत विद्याचरण शुक्ला किती वरच्या स्तरावर पोचले होते हे लक्षात येते.

आणीबाणी म्हणजे संजय गांधी आणि आणीबाणी म्हणजेच विद्याचरण शुक्ला असे समीकरण तयार झाले होते. या काळात शुक्ला हे माहिती आणि प्रसारण मंत्री झाले होते. रेडिओ हे माध्यम त्या काळामध्ये अधिक लोकप्रिय होते. त्या रेडिओवरून आणीबाणीचा एकांगी प्रचार करण्याच्या बाबतीत शुक्ला यांनी अगदी वरचे टोक गाठले होते. त्या काळात आकाशवाणीला इंदिरावाणी म्हटले जात असे ते त्यामुळेच होय. या काळात नामवंत पार्श्‍वगायक किशोर कुमार यांनी कॉंग्रेसच्या एका मेळाव्यात गाणे म्हणण्यास नकार दिला होता. तेवढ्या वरून शुक्ला यांनी त्यांचा छळ करायचे ठरवले. जो पर्यंत शुक्ला मंत्री होते तोपर्यंत आकाशवाणीवर किशोर कुमार यांचे एकही गाणे वाजवले गेले नव्हते. असे हे विद्याचरण शुक्ला आणीबाणीत एवढे बदनाम होऊनसुध्दा वेगवेगळ्या पक्षात गेले. ज्या पक्षांनी आणि नेत्यांनी आणीबाणीला कठोर विरोध केला होता, त्या सर्व नेत्यांनी विद्याचरण शुक्ल यांना आपल्या पक्षात प्रवेश दिला, स्थान दिले आणि मंत्रिपदसुध्दा दिले. ही आपली शोकांतिकाच आहे.