पटना दि.१२ – गुजराथचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची भाजप प्रचार प्रमुख पदी निवड झाल्यानंतर संयुक्त जनता दलातील हालचालींना वेग आला असून जनता दल कोणत्याही क्षणी एनडीएतून बाहेर पडत असल्याची घोषणा करण्याची शक्यता आहे असे खात्रीलायक वृत्त आहे. बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दल संयुकतचे नेते नितिशकुमार कालपासूनच बिहारमधील सर्व आमदार आणि जनता दल नेत्यांच्या बैठका घेत आहेत. कालची बैठक झाली असली तरी आजही पुन्हा ते बैठक घेणार आहेत. बिहारच्या सर्व आमदारांना १५ जूनपर्यंत राज्याबाहेर न जाण्याच्या सूचनाही दिल्या गेल्या असल्याचे समजते.
आगामी लोकसभेत पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून मोदी यांचे नांव घोषित करण्यास नितिशकुमार यांनी प्रथमपासूनच विरोध दर्शविला होता. सध्या बिहारमध्ये भाजप आणि जनता दलाचे युती सरकार आहे. मोदींची भाजप प्रचार प्रमुख पदी नियुक्ती हे त्यांच्या पंतप्रधान पदाच्या उमेदवारीच्या दृष्टीने टाकलेले पहिले पाऊल मानले जात असल्याने जनता दलात आता एनडीएत राहायचे का बाहेर पडायचे यावर विचारमंथन सुरू झाले आहे. त्यातून जनता दल युतीतून बाहेर पडण्याचीच शक्यता अधिक आहे व त्यासंबंधीची घोषणा कोणत्याही क्षणी जनता दल युनायटेडचे नेते शरद यादव करतील असे समजते.
मोदी यांच्या निवडीनंतर भाजप ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवानी यांचे राजीनामा नाट्य संपविण्यात भाजप नेते यशस्वी झाले असले तरी जनता दलाच्या रूपाने त्यांच्यासमोर दुसरे संकट उभे ठाकले आहे.