मुलांनी दिले अन वाळवीने नेले

बिजिग दि.१२ – दैवाने दिले अन कर्माने नेले ही म्हण आपल्याला चांगलीच ठाऊक आहे. चीनमधील एका वृद्धेला मात्र मुलांनी दिले आणि वाळवीने नेले असे म्हणण्याची पाळी आली आहे. मुलांनी दिलेले पैसे सुरक्षित न ठेवण्याबद्दल तिला चांगलीच अद्दल घडली आहे.

झाले असे की या वृद्धेला तिच्या मुलांनी ६५ हजार अमेरिकन डॉलर्स किंमतीच्या युवान या चिनी चलनाच्या नोटा दिल्या होत्या. या महिलेने वेळीच त्या बँकेत न भरता घरातीलच एका लाकडी ड्रॅवरमध्ये प्लॅस्टीकच्या पिशवीत भरून ठेवल्या. कुठे बँकेत जा – या असा विचारही कदाचित तिने केला असेल. सहा महिने उलटल्यावर घरातील कांही सजावट करण्यासाठी तिला पैशांची गरज लागली तेव्हा या नोटा वापरण्याचा निर्णय घेऊन तिने ते ड्रावर उघडले खरे ! पण हाय रे दुर्देवा! या सगळ्या नोटांना वाळवी लागली होती. त्यातील बर्‍याचशा नोटा वाळवीने खाऊन टाकल्या होत्या.

शेवटी बँकेच्या स्टाफला पाचारण करण्यात आले. त्यांनी दिवसभर कष्ट करून वाळवीच्या तडाख्यातून वाचलेल्या थोड्याबहुत नोटा त्या सगळ्या लगद्यातून बाहेर काढल्या. स्कॅन केल्यानंतर त्यातील ५५ हजार डॉलर्स किमतीच्या नोटा कशाबशा ओळखता आल्या मात्र वाळवीने फस्त केलेल्या सुमारे १० हजार डॉलर्स किमतीच्या नोटा गेल्या त्या गेल्याच.