भाजप खासदार सुजय विखे रेमडेसिवीर इंजेक्शनवरुन अडचणीत?


औरंगाबाद : खाजगी विमानाने भाजप खासदार सुजय विखे यांनी अहमदनगरला आणलेल्या 10 हजार रेमडेसिवीर इंजेक्शनवरुन त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. या विमान प्रवास आणि त्यातून आणलेल्या सामानाबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने पूर्ण माहिती मागवली आहे. त्याचबरोबर किती खाजगी विमाने 10 ते 25 एप्रिल दरम्यान आली आणि त्यात काय सामान होते? याचीही माहिती न्यायालयाने मागितली आहे.

ही सगळी माहिती विमानतळ प्राधिकरणाने न्यायालयाला द्यायची आहे. सोबतच नगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत सुजय विखे यांनी केलेल्या कृतीचे समर्थन केले होते. न्यायालयाने त्यावर जिल्हाधिकाऱ्यांच्या या कृतीवरही संशय आणि नाराजी व्यक्त केली आहे. विखेंना वाचवण्यासारखे जिल्हाधिकारी यांचे वर्तन असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. अहमदनगर जिल्ह्यात खाजगी विमानाने भाजप खासदार सुजय विखे पाटील यांनी रेमडेसिवीर आणले होते. त्यानंतर याबाबत वाद सुरू झाला होता आणि उच्च न्यायालयात याचिका सुद्धा दाखल झाली. या याचिकेवर पुढील सुनवणी 3 मे रोजी होणार आहे.

चार याचिकाकर्त्यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे. यात अरूण कडू यांच्यासह इतर तीन जणांचा समावेश आहे. 24 तारखेला 10 हजार रेमडेसिवीर आणले आहेत. त्यांच्यामार्फत दाखल केलेल्या याचिकेतून काही प्रश्न उपस्थित केले असून गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. रेमडेसिवीर खरेदी वाटपाची परवानगी नसताना कसे काय इंजेक्शन आणले. सध्या पुर्ण भारतात आणि दिल्लीत कमतरता असताना हे इंजेक्शन मिळाले कसे? जिल्हाधिकारी यांच्यामार्फत ही खरेदी का नाही झाली? 26 तारखेला नोटीस काढली होती. ही इंजेक्शन कुठे गेली? ते खरे आहे का? असे सवाल खंठपीठासमोर उपस्थित केले आहेत.