एडवर्ड स्नोडेनला राजकीय आश्रय देण्यास रशिया तयार

मास्को दि.१२ -नागरिकांच्या इंटरनेट आणि फोन वापरावर बारीक नजर ठेवण्याची अमेरिकन सरकारची सूचना जगजाहीर करणार्‍या एडवर्ड स्नोडेन याने राजकीय आश्रय मागितला तर तो देण्याबाबत रशिया सकारात्मक निर्णय घेईल असे रशियाचे अध्यक्ष ब्लादीमीर पुतीन यांचे प्रवक्ते दमित्री पेस्कोव यांनी पत्रकारांसमोर सांगितले आहे. अर्थात स्नोडेनने तशी विनंती केली तर परिस्थिती पाहूनच त्यावर निर्णय घेतला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

अमेरिकन सरकारची इंटरनेट टेहळणीची गुप्त सूचना जगजाहीर करून स्नोडेनने चांगलीच खळबळ माजविली होती. अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा संस्थेसाठी काम करणार्‍या एका संस्थेत २९ वर्षीय स्नोडेन तंत्रज्ञान तज्ञ म्हणून नोकरी करत होता. अमेरिकेच्या या इंटरनेट व फोन हेरगिरीचा गौष्यस्फोट केल्यानंतर त्याला पुढील धोक्याची जाणीव झाली आणि तो हाँगकाँगला पळून गेला. त्यावर अमेरिकेच्या सांसदांनी हाँगकाँगकडे त्याचे प्रत्यार्पण करण्याची मागणी केली तेव्हा तो तेथूनही गायब झाला असल्याचे समजते.