कठीण काळात बॉलीवूडचा ‘अण्णा’ पुरवत आहे मोफत ऑक्सिजन कंसंट्रेटर


देशासह राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अक्षरशः थैमान घातलेले असताना अनेक सेलिब्रेटी आणि क्रिकेटपटूंना अशा संकटकाळात मदतीचा हाथ पुढे केला आहे. या यादीत आता बॉलीवूडचा ‘अण्णा’ अर्थात अभिनेता सुनील शेट्टी याच्या देखील नावाचा समावेश झाला आहे. तो मोफत ऑक्सिजन कंसंट्रेटर पुरवठ्याच्या उपक्रमात सामील झाला असून त्याने गरजूंना मदत करण्याचे आवाहनही केले आहे.

याबाबत केलेल्या ट्विटमध्ये सुनील शेट्टीने लिहिले आहे की, काही टेस्टिंग टाइम्समधून आपण जात आहोत, पण एकमेकांना मदत करण्यासाठी आपले लोक ज्या पद्धतीने हात पुढे करत आहेत तो एक आशेचा किरण आहे. तसेच आपण केव्हीएन फाउंडेशनशी जोडले गेले असून लोकांना मोफत ऑक्सिजन पुरवत आहे.


आपल्या ट्विटमध्ये सुनील शेट्टीने पुढे असे लिहिले आहे की, माझ्या सर्व मित्रांना आणि चाहत्यांना मी आवाहन करतो. जर तुम्हाला गरज असेल तर तुम्ही मला मेसेज करु शकता, ज्यांना मदतीची गरज आहे, अशा लोकांना तुम्ही ओळखता किंवा तुम्हालाही या मिशनचा भाग व्हायचे असल्यास हा मेसेज शक्य तेवढा व्हायरल करा.


सध्या केव्हीएन फाउंडेशन फक्त मुंबई आणि बंगळुरूमध्ये कार्यरत आहेत. यासह त्याने लोकांना आपले योगदान देण्याचे आवाहनही केले आहे. अभिनेता अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्नाने देशातील ऑक्सिजनची कमतरता लक्षात घेता सुमारे 100 ऑक्सिजन कंसंट्रेटर दिले आहेत. यासाठी त्यांनी अधिकृत आणि विश्वासार्ह एनजीओची माहिती मागितली होती.