लंडन दि.१० – लंडनच्या सुप्रसिद्ध सेल्फ्रिजिस डिपार्टमेंटल स्टोअरवर बुरखा घालून आलेल्या सहा जणांनी हॉलिवूड स्टाईल दरोडा टाकून १५.२ लाख डॉलर्स किमतींची महागडी घड्याळे लंपास केल्याचे स्कॉटलंड यार्डकडून सांगण्यात आले आहे. या बुरखाधारी चोरट्यांनी काचेचे दार फोडून होल्डालमधील महागडी घड्याळे चोरली आणि वाहनांतून पळ काढला.
स्कॉटलंड यार्डने चोरीची घटना घडताच त्वरेने तपासास सुरवात करून दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. या चोरट्यांनी पळून जाण्यासाठी वापरलेली मोपेड, दोन मोटरसायकली जप्त केल्या आहेत. मोपेडवरून पळणार्याव चोरट्यंना रस्त्यातील नागरिकांनीच अडविले असल्याचेही समजते. या दोघांपैकी एकाला या धावपळीत फ्रॅक्चर झाल्याने रूग्णालयात दाखल केले गेले आहे तर दुसर्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले असे समजते.
पोलिसांच्या अंदाजानुसार चोरी पूर्वनियाजित कट करून करण्यात आली आहे. मात्र इतक्या जुन्या, प्रसिद्ध आणि गर्दीच्या ठिकाणी असलेल्या या स्टोअरमध्ये झालेल्या चोरीमुळे नागरिक आश्चर्यचकीत झाले. दुकानात चोरट्यांच्या कांही वस्तू पोलिसांना मिळाल्या असून त्याची तपासणी केली जात आहे.