मुंबई- मुंबई, ठाणे, नवी मुंबईमध्ये सोमवारी पहाटेपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. रविवारीपण पावसाने दणका दिला होता. सलग दोन दिवसापासून कोसळत असलेल्या पावसामुळे मुंबईकरांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सोमवारी सकाळपासूनच पावसामुळे उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य तसेच हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील गाड्या ३० ते ४० मिनिटे उशिराने धावत आहेत. अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सर्वसामांन्य चाकरमानाचे हाल होत आहेत.
दोन दिवसापासून सुरु असलेल्या पावसाने सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. त्यासोबतच झाड कोसळणे, पाणी साचणे यामुळे प्रमुख रस्त्यांवरिल वाहतूकीची कोंडी झाली आहे. पावसाने दमदार सुरुवात केल्याने बळीराजा सुखावला असला तरी सर्वसामन्याचे मात्र हाल होत आहेत. मुंबईतील वरळी, लोअर परेल, हिंदमाता, दादर, माटुंगा, सायन (शीव), किंग्ज सर्कल, कुर्ला, घाटकोपर, वांद्रे, माहिम, सांताक्रूझ, विलेपार्ले, अंधेरी गोरेगाव आणि मालाड या परिसरात पावसामुळे पाणी साचले आहे.
दरम्यान हवामान खात्याने अंदाजानुसार येत्या ४८ तास मुसळधार पावसाची शक्यता आहे. राज्यभरात मान्सून सक्रिय झाला असून कोकणातही पावसाचा जोर कायम आहे. येत्या काळात सर्वत्र मुसळधार पावसाची शक्यता वर्तविल्याने सर्वत्र अतिदक्षेतेचा इशारा देण्यात आला आहे.