आपण सर्वजण ज्याची डोळ्यात प्राण आणून वाट पहात आहोत तो आपला जीवनदाता पाऊस दमदारपणे सुरू झाला आहे. मेच्या शेवटच्या पंधरवड्यात हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजामध्ये मोसमी पावसाचे आगमन वेळेवर होईल असे म्हटले होतेच. पण हा अंदाज वर्तविणार्या तज्ञांनाही पावसाने थोडीशी हुलकावणी दिली. तेवढ्या पुरती अनिश्चिततेची जाणीव झालीही होती. परंतु जूनच्या पहिल्या आठवड्यातच पावसाचे आगमन होणार अशी चिन्हे दिसायला लागली आणि आता गेल्या आठवडाभरात महाराष्ट्राच्या सर्व भागात कमी अधिक प्रमाणात का होईना पण पावसाने हजेरी लावलेली आहे. या पावसावर खरीप पिकांची पेरणी होईल याची काही शाश्वती आता देता येत नाही. किंबहुना काही शेतकर्यांना याच पावसावर पेरणी करण्याचा मोह होत असेल तर त्यांनी ती करू नये असा सल्ला कृषी खात्याने दिलेला आहे. अगदी नेमक्या भाषेत सांगायचे झाले तर हा मोसमी पाऊस नसून मोसमपूर्व म्हणजेच मान्सूनपूर्व पाऊस आहे. या पावसामुळे निर्माण झालेल्या ओलीवर शेतकर्यांनी ङ्गार तर खरीप पेरणीपूर्वीची मशागतीची कामे करायला हरकत नाही. मोसमी वार्याचा पाऊस पुढच्या आठवड्यात अपेक्षित आहे. तेव्हा याच पावसावर पेरणी करण्याची घाई केल्यास काहीसा घोटाळा होण्याची शक्यता आहे.
पावसाने आशा पल्लवित
सुरूवातीला बरा पाऊस पडलेला दिसेल आणि नंतर पाऊस मोठी उघडीप देण्याची शक्यता आहे. तेव्हा शेतकर्यांनी हा सल्ला मानून खरिपाच्या पिकांची घाई करू नये. गेल्या तीन चार वर्षात तरी पेरण्यांचे असे वेळापत्रक चुकल्याचे लक्षात आलेले आहे. आता पाऊस पडत असला तरी तो काहीसा अनिश्चित राहू शकेल. याची कल्पना करून त्याला आपण कसे तोंड देणार आहोत याचीही तयारी करण्याची गरज आहे. वर्षानुवर्षे आपण परंपरागत पध्दतीने शेती करत आहोत. खरीप आणि रब्बी अशा दोन हंगामात पिकांची वाटणी करत आलो आहोत. ज्या कोण्या काळामध्ये अशी वाटणी करण्याची प्रथा पडली त्या काळात पाऊस चांगला आणि नियमित पडत असेलही पण आता पावसाची लहर ङ्गिरली आहे. तो बिनभरवशाचा झाला आहे. विशेषतः गेल्या २० वर्षांमध्ये एकाच वेळी भरपूर वर्षाव करणे हे पावसाचे तंत्र राहिलेले आहे. तज्ञांनी तसे अनुभवलेले आहे. त्यामुळे पावसाचे तंत्र बदलले असेल तर आपल्याला शेतीचे तंत्रही बदलावे लागेल. शेतकर्यांनी तसे ते बदललेलेही आहे. त्यांनी त्यासाठी ङ्गार मोठा अभ्यास केलेला नाही. परंतु शेतकरी आपले तंत्र अनुभवाने बदलत असतात.
खरीप किंवा रब्बी अशी पिकांची वाटणी करण्यापेक्षा खरिपातच पण उशिरा घेता येतील अशी पिके घेण्याकडे शेतकर्यांचा आता कल दिसत आहे. हा बदललेला कल त्याच्या अनुभवाच्या शास्त्राने निर्माण झाला आहे. पूर्वीच्या काळी भूईमुगाचे पीक मराठवाड्यात खरीप हंगामात घेतले जात असे. शेतकर्यांच्या भाषेत सांगायचे झाले तर भूईमुगाचे पीक यशस्वीरित्या यायचे झाले तर पावसाळ्यातल्या सगळ्या नक्षत्रात पाऊस पडायला पाहिजे. परंतु तसा तो पडत नाही असा अनुभव यायला लागल्यावर शेतकर्यांनी भूईमुगाला सुट्टी दिली त्याच्या ऐवजी संकरित ज्वारीचा प्रयोग केला. त्यानंतर सूर्यङ्गुलाचा प्रयोग केला. परंतु या दोन्ही पिकांमुळे पैसा चांगला मिळत नाही असा अनुभव यायला लागला. त्यामुळे शेतकरी पर्याय शोधायला लागले आणि त्यांना आता सोयाबीन आणि कापूस हे दोन चांगले पर्याय मिळाले आहेत. मृग नक्षत्राच्या पावसावरच लागवड केली पाहिजे अशी या दोन पिकांची अट नाही. शिवाय त्यांना पैसाही चांगला मिळतो. असा निदान गेल्या दशकभरातला तरी अनुभव आहे. म्हणूनच महाराष्ट्रात आता कापूस आणि सोयाबीनची लागवड हजारो एकर जमिनीवर झालेली आहे. शेतकर्यांनी हे तंत्र समजून घेतले पाहिजे. धड रब्बी नाही धड खरीप नाही अशा मध्य हंगामी पिकांची कास धरली पाहिजे. महाराष्ट्रामध्ये वर्षानुवर्षे घेतले जाणारे आणि चांगला पैसा देणारे असे मध्य हंगामी पीक म्हणजे तूर.
तुरीच्या पिकाचा उल्लेख खरीप पीक म्हणून केला जातो खरा पण ते पीक थोड्या उशिराने पेरले तरी चालते. तुरीचे पीक घेतल्यानंतर रब्बी हंगामात दुसरे पीक घेता येत नाही. मग तुरीची पेरणी उशिराने केलेली असो की लवकर केलेली असो. मात्र उशिराने पाऊस पडल्यास तूर घ्यायला काही हरकत नाही. पावसाने लांबण लावली की शेतकरी खरीप हंगाम गेला म्हणून हातपाय गाळून बसतात. तेव्हा त्यांनी थोडा परंपरागत विचार बाजूला ठेवून हा विचार मनातून काढून टाकला पाहिजे. दुष्काळ पडला म्हणून काहीच न पेरण्यापेक्षा असे मध्य हंगामी पीक घ्यायला काही हरकत नाही. त्याचा उतारा थोडा कमी पडेल पण दुष्काळ पडला म्हणून रान मोकळे ठेवण्यापेक्षा असे पीक घेेणे कधीही योग्यच ठरेल. असा सारा विचार करून आता शेतकर्यांना मक्याचेही एक पीक सापडले आहे. सोयाबीन, कापूस आणि मका या पिकांचे वैशिष्ट्य असे आहे की त्यांचे मार्केट जागतिक स्वरूपाचे आहे. त्यामुळे त्यांना मागणीही चांगली असते. एकंदरीत जगाचा विचार करून शेतकर्यांनी आपल्या शेतीचे नियोजन करण्याची गरज आहे. पावसाला सुरूवात तर छान झाली आहे. त्यामुळे सर्व शेतकर्यांना शुभेच्छा देऊया.
