उद्धव-राज यांनी एकत्र यावे

सोलापूर, दि.3 – गेल्या काही दिवसापासून राज- उद्धव यांनी एकत्र यावे यासाठी अनेक नेत्यांनी प्रयत्न केले. मध्यंतरीच्या काळात टाळी देण्या-घेण्यावरून बरेच वादंग माजले होते. परवाच रिपाइं नेते रामदास कदम यांनी मसनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीत येऊन काँग्रेस आघाडी नेस्तानावूत करावी, असे मत व्यक्त केले. त्यावेळी उद्धव यांनी नरमाईची भूमिका न घेता आठवलेंनाच चार सबुरीचे सल्ले दिले. मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे, असे मत शिवसेना नेते रामदास कदम यांनीही व्यक्त केले आहे.

रिपब्लिकन नेते रामदास आठवलेंनंतर आता रामदास कदम यांनीही असे वक्तव्य केल्याने सगळीकडेच आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. कदम यांनीही शिवसेना आणि मनसेच्या एकत्रीकरणाची हाक दिली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नपूर्तीसाठी राज-उद्धव या दोन्ही भावांनी एकत्र यावे, अशी अपेक्षा रामदास कदम यांनी व्यक्त केली आहे.

उद्धव ठाकरे यांनी याआधीही टाळी दिली होती. त्यानंतर राज ठाकरेही कधी खिडकीतून, कधी वाकून बघत होते. कोण शुकशुक करतंय का, याची वाट बघत होते. हे सगळं करण्यापेक्षा दोन्ही भावांनी एकत्र यायला काय हरकत आहे, असे कदम म्हणाले.

शेवटी दोघेही एका घरातील आहेत. एकत्र बसून त्यांनी विषय संपवून टाकावा. राज यांनी मोठ्या भावाकडे जावे. बोलावे आणि दोघांनी मिळून सत्ता आणून दाखवावी आणि बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करावे, असे कदम यांनी पंढरपूर येथे म्हटले आहे.